मुंबई : राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाची पहिली लढाई भाजप व शिंदे गटाने जिंकली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत ही निवडणूक जिंकली. तर, मविआच्या राजन साळवींनी १०७ मते मिळवता आली.
सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक जाईल.
आज अधिवेशनात कामकाजाच्या शेवटी शोकप्रस्ताव मांडण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. आजच्या दिवसाचे कामकाज संपले आहे. आता उद्या सकाळी ११ वाजता विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून सरकारची मुख्य परीक्षा असणार आहे. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदी निवडीनंतर सरकारने पहिली लढाई जिंकली आहे.
राहुल नार्वेकर यांनी मानले आभार
राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित सर्वांचे आभार मानले. महत्वाची विधायके चर्चेविना पारित केले जाणार नाहीत असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. तसेच नियमांचे पालन केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. याच सभागृहात चार माजी विधानसभा अध्यक्ष असल्याने हे माझे भाग्य असल्याचेही ते म्हणाले आहेत.
शिवसेनेचा व्हीप धुडकावला
मविआचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे, असा व्हीप शिवसेनेतर्फे आपल्या सर्व आमदारांना बजावण्यात आला होता. मात्र, शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप पाळला नाही. शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे. बविआ आणि मनसेच्या आमदारांनाही राहुल नार्वेकरांना मतदान केले. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा सहज पार केला. अध्यक्षपदासाठी त्यांना १६४ आमदारांनी मतदान केले. समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी व रईस शेख तटस्थ राहिले. एमआयएमचे आमदारही तटस्थ राहिले. त्यांनी मविआ उमेदवाराला मत दिले नाही. त्यामुळे मविआ उमेदवार राजन साळवी यांना १०७ मतेच मिळवता आली.