शफक खान ही मनोरंजन क्षेत्रातील एक गुणी, संवेदनशील आणि मोठी क्षमता असलेली दिग्दर्शक आहे. कित्येक मालिकांचं सहदिग्दर्शन, एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शॉर्टफिल्म, पंजाबी चित्रपट आणि आता ‘येरे येरे पावसा’ मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन असा तिचा प्रवास रंजक, रोचक अन् तेवढाच मेहनतीचाही आहे.
अर्चना सोंडे
“कोशिश भी कर, उमीद भी रख, रास्ता भी चून, फिर इस के बाद थोड़ा मुक़द्दर तलाश कर”
‘प्रयत्न पण कर, विश्वास पण ठेव, आपला मार्ग निवड आणि मग थोडासा नशिबाचा शोध घे.’
असा मतितार्थ असलेली ही शायरी लिहिलेली आहे सुप्रसिद्ध शायर निदा फाजली यांनी. ही शायरी तंतोतंत तिच्या आयुष्याला लागू पडते. तिने प्रयत्न केला, स्वत:वर आणि अल्लाहवर विश्वास ठेवला. स्वत:चा मार्ग स्वत:च निवडला. आता ती एक दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून स्वत:चं नशीब घडवत आहे. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना ती चित्रपट क्षेत्रात स्वत:चे पाय रोवून घट्ट उभी राहत आहे. यशस्वी निर्माती-दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची नशीब घडवू पाहणारी ती मुलगी म्हणजे शफक खान.
शफक मुंबईच्या वांद्रे परिसरात लहानाची मोठी झाली. आई कमर खान ही गृहिणी, तर वडील शफीक खान यांचा रंगांचा व्यवसाय होता. भारतीय रेल्वेला रंग पुरवण्याचे काम ते करीत. शफकला दोन भाऊ. मोठ्या भावाचे नाव अस्लम आणि धाकट्याचे नाव शरिक. या तिन्ही भावंडांचे एकमेकांशी अतिशय चांगले बॉण्डिंग आहे. तिचं शिक्षण वांद्रे इथल्या ‘माऊंट मेरी’ कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. आई-वडील आधुनिक विचारांचे होते. त्यांनी कधीही शफक आणि तिच्या भावांवर त्यांचे विचार लादले नाहीत. शाळेत असताना अभ्यासाच्या दृष्टीने ती सामान्य विद्यार्थिनी होती. खेळासारख्या अभ्यासेतर विषयांमध्ये तिला अधिक रस असायचा. पण तरीही कधीच तिने अभ्यासाचा कंटाळा केला नाही, हे मात्र खरं.
सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शफक या क्षेत्रात आली तरी कशी, याचे सर्वांनाच आश्चर्य आहे. शफकच्या घरात सिनेक्षेत्राशी संबंधित कोणीच नाही. पण वांद्रे परिसरात बालपण गेल्यामुळे सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव जवळून घेतला आहे. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिचे नाव अलिगढ विद्यापीठात दाखल करण्यात आले. शफकची आई स्वतः या विद्यापीठातून शिकलेली असल्यामुळे तिनेच या विद्यापीठाचा पर्याय तिला सुचवला. सायकॉलॉजी हा विषय घेऊन ती पदवीधर झाली. कॉलेजमध्ये शिकत असताना तिथे कळत-नकळतपणे नाटकं लिहिण्याची, दिग्दर्शनाची आवड रुजत गेली. त्यामुळे अलिगढ विद्यापीठातली ती पाच वर्षं कशी गेली, ते कळलंच नाही. शिक्षण संपल्यावर शफक मुंबईत परतली. रिकामं बसून करायचं काय?, या विचाराने गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. त्याच दरम्यान निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या ऑफिसमध्ये तिने पार्टटाइम काम करण्यास सुरुवात केली. तिथे संगणकाचे ज्ञान आत्मसात केले. शिवाय सिनेमाची निर्मिती, त्याचे लेखन-दिग्दर्शन, वितरण अशा विविध गोष्टींशी शफकची ओळख होत गेली. थोडक्यात सिनेइंडस्ट्रीचे काम चालते कसे? या विषयीची माहिती मिळाली.
कालांतराने करण जोहरबरोबर २ ते ३ महिने त्याची सेक्रेटरी म्हणून तिने काम केलं. तिथे तिची ओळख विनिता नंदांशी झाली. विनिता नंदा म्हणजे नामांकित दिग्दर्शिका. “मै इस फिल्ड में नयी हूँ. पर मुझे इसी फिल्ड में कुछ करना है. सिखना है.” तिचा हा आत्मविश्वास पाहून विनिता नंदा शफकला ‘ट्रॅक सिनेमा’ कंपनीत घेऊन गेल्या. साधारण वर्षभरच या कंपनीत कामाच्या विविध जबाबदाऱ्या वाहण्याची संधी मिळाली. म्हणजे निर्मिती, लेखन – दिग्दर्शन अशा विविध जबाबदाऱ्या वाहता आल्या. ‘ट्रॅक सिनेमा’ या कंपनीत तयार होणारे विविध प्रोजेक्ट्स घेऊन लंडन. टोरांटोलाही जाता आले. त्यानंतर कुठेतरी स्वत:ची कंपनी सुरू करावे, असे वाटू लागले. ‘एस. क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ या कंपनीची सुरुवात केली. दुसऱ्याच्या कंपनीमध्ये काम करणे आणि स्वतःची कंपनी असणे, यात शेवटी फरक पडतो. स्वत:चे निर्णय स्वतः घेता येतात. कंपनीतर्फे शफकने सुरुवातीला म्युझिक व्हीडिओज, कॉर्पोरेट फिल्म्स केल्यात. त्यानंतर ‘देसी रोमिओ’ या पंजाबी सिनेमासाठी दिग्दर्शन आणि लेखन केलं. दिग्दर्शन करत असताना निर्मितीकडे वळली. त्याचं निमित्त ‘लौंडा नाच’ हा लघुपट ठरला. मनीष या लेखक मित्राने बिहारमधल्या ‘लौंडा नाच’ या कुप्रसिद्ध प्रथेवर लघुपट बनवण्याविषयी सुचवलं. संशोधनाअंती लघुपट तयार केला. या लघुपटाने अबर्ट केनी पुरस्कार प्राप्त केला आहे.
शफकचा दुसरा महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे ‘येरे येरे पावसा’ हा सिनेमा. ‘लौंडा नाच’ नंतर भूषण पवार ‘येरे येरे पावसा’ची कथा लघुपट बनवण्यासाठी घेऊन आला होता. पण त्यावर पूर्ण लांबीचा सिनेमा बनवला. छाया कदम, मिलिंद शिंदे तसेच विनायक पोतदार, आर्य आढाव या बालकलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या सिनेमाचं शूटिंग महाराष्ट्रातील ज्या भागाने गेल्या पाच वर्षांपासून पाऊसच बघितलेला नाही, अशा नाशिकमधल्या एका खेडेगावात केलेले आहे. या सिनेमाने १४ देशांतल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये १७ पुरस्कार पटकावले आहेत.
आजच्या घडीला शफक खान आणि त्यांची एस. क्यूब ही कंपनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांना वाहिलेल्या सिनेमांची निर्मिती करत आहे. भविष्यातही करत राहणार आहे.
शफक खान ही मनोरंजन क्षेत्रातील एक गुणी, संवेदनशील आणि मोठी क्षमता असलेली दिग्दर्शक आहे. कित्येक मालिकांचं सहदिग्दर्शन, एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शॉर्टफिल्म, पंजाबी चित्रपट आणि आता ‘येरे येरे पावसा’ मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन असा तिचा प्रवास रंजक, रोचक अन् तेवढाच मेहनतीचाही आहे. शफक या ऊर्दू शब्दाचा अर्थ हा संधिप्रकाश, आशेचा किरण आहे. शफक या कित्येक नव्या कलाकारांच्या आयुष्यातील तसेच महाराष्ट्रातील प्रश्न अतिशय कल्पकतेने मांडण्यासाठी आशेचा किरण ठरल्या आहेत. त्यामुळे त्या ‘लेडी बॉस’ ठरतात.