अनुराधा परब
शेतीच्या शोधाने माणसाला एका जागी स्थिर होण्यासाठी जसे सबळ कारण दिले तसेच त्या स्थिरतेतून निर्माण झालेल्या संस्कृतीने जगण्याला अर्थ दिला. शेतीमध्ये पेरणी केल्यापासून ते पीक हाती येईपर्यंतच्या काळामध्ये सण, उत्सव, व्रतवैकल्ये, देवदेवतांचे पूजाविधी आकाराला आले. माणसाचे भरणपोषण करणारी शेती अर्थात काळ्या आईप्रती कृतज्ञता म्हणून पेरणीपूर्वी तिची पूजा करण्याची परंपरा रूढ झाली.
नांगरटीपूर्वी दूध-दही-तूपाचा नैवेद्य भूमीला देण्याची वहिवाट अथर्ववेदातील कृषिसुक्तांपासून पाहायला मिळते. आपल्या अन्नदात्रीने पेरलेल्या बियांतून भरघोस पीक द्यावे, त्यायोगे आपल्या कुटुंबाचे भले व्हावे, याकरिता प्रार्थना केल्याचे सुक्तामध्ये आढळून येते. अर्थात पेरणीपूर्वीचे विधी, पूजादी प्रथांमध्ये प्रदेशानुसार वेगळेपण आलेले असले तरी भूमीबद्दलचा कृतज्ञता भाव अखंड प्रवाहित राहिला. याच आनुषंगाने दक्षिण कोकणामध्ये पाहू जाता सुफलनाचे प्रतीक म्हणून भूमी-भूमाता तिचे प्रतीक म्हणजे वारूळ आणि नाग यांची पूजा अस्तित्वात आल्याचे पाहायला मिळते.
वारूळ हे नागाचे वसतीस्थान. वारुळाचे स्थान हे निबिड अरण्यात किंवा साधारणपणे आडबाजूला असते. वन्य आणि विषारी सरीसृप वर्गातील नाग स्वसंरक्षणासाठी वारुळाचा आश्रय घेतो. विषारी नाग किंवा साप चावणे हे लौकिकार्थाने मानवी जीवनासाठी घातक आहे. असे असले तरीही संस्कृतीमधे पशुपूजा प्रचलित होण्यामागचे कारण डॉ. आ. ह. साळुंखें स्पष्ट करतात. ते म्हणतात, ‘पशुपूजा ही बहुधा प्रतीकात्मक असते. विशिष्ट पशूची पूजा करताना त्याच्या ठायीच्या निसर्गशक्तींची किंवा देवतांची पूजा अभिप्रेत असते. पक्षी, बैल, मासा, नाग इत्यादी पशूंच्या ठिकाणी काही विलक्षण – बिळातून अगर वारुळातून किंवा झाडाझुडुपांतून अचानक प्रकट होणे, सुफलनाची प्रचंड क्षमता यासारखे अनिर्वचनीय असे सामर्थ्य आहे, असे आदिम मानवाला वाटत असे. याशिवाय माणसांप्रमाणे पशूंमध्येही आत्मा असतो, या समानतेमुळेच देवता, मृतात्मे पशुरूपात फिरत राहतात, वावरतात आणि ते प्रसन्न झाल्यास कृपा आणि कोप झाल्यास नुकसानही करू शकतात, अशा समजुतींमुळेदेखील मनुष्य पशुपूजेला प्रवृत्त होत असे.’
रूढी किंवा परंपरा समाजमनामध्ये इतक्या घट्टपणे खोलवर रुजण्यामागील शास्त्रार्थ शोधण्यापेक्षा जे पूर्वापार चालत आहे, तसे ते स्वीकारण्याकडे मानवी मनाचा कल अधिक असतो. रूढींना मिळालेले धर्माचे अधिष्ठान आणि लोकधारणेतील त्यांचे महत्त्व याला कारण ठरताना दिसून येते. “शास्त्रात रूढीर्बलीयसी” असे संस्कृतवचन यावरच आधारित आहे.
निसर्गातील ज्या-ज्या गूढ, अनिर्वचनीय सामर्थ्यांची उकल होऊ शकली नाही तिथे-तिथे माणसाने निसर्गाशी जुळवून घेत त्याभोवती प्रथा-पूजा-रीती गुंफत निसर्गसन्मुख जीवनशैलीचा अंगिकार केला. लोकसंस्कृतीमध्ये रूजवले गेलेले यासंबंधीचे विधी हेसुद्धा निसर्गातील घटकांचाच वापर करत माती, दगड, पाने, फुले, फळे, साल वगैरेंनी पूर्ण होताना दिसतात. त्यामागेदेखील हेच कारण आहे.
निसर्गाचा माणसाप्रमाणेच पशू हासुद्धा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच शिमगा, ग्रामदेवतांच्या जत्रा-उत्सव, नागपूजा इत्यादी सणांची आखणी ही शेतीसंस्कृतीच्या आनुषंगाने बांधली गेली. यामुळेच ग्रामसंस्कृती किंवा लोकसंस्कृतीमध्ये आपल्याला वेताळ, रवळनाथ, काळभैरव, काळकाई अशा देवदेवतांचा आढळ दिसतो.
निसर्गकोपापासून अपाय होऊ नये म्हणून पूजल्या जाणाऱ्या या देवतांची उपासना स्वीकारण्यामागे भीतीयुक्त श्रद्धाभाव आढळून येतो. परिणामी सहजपणे विश्वास ठेवता येणार नाही, अशा स्वरूपाच्या कथा, दंतकथा, आख्यायिका त्याभोवती गुंफलेल्या दिसून येतात.
नागपूजादेखील याच लोकसंस्कृतीचा भाग आहे. चातुर्मास कथांमध्ये येणारी नागपंचमीची कहाणी इथे विचारात घेता येईल. कोकणातील प्राचीन नागवंशाचे प्रतीक म्हणून ही पूजा प्रचलित झाल्याचे मत डॉ. प्र. न. जोशी यांनी मांडले आहे. ते लिहितात, ‘महाराष्ट्रातील वस्ती ही प्रामुख्याने आर्य, द्रविड व नाग यांच्या मिश्रणाची आहे. नाग ही त्यावेळी एक जमात होती. म्हणून साप किंवा नाग हा उपद्रवकारक प्राणी नसून तो उपकारक प्राणी आहे. या दृष्टीने कृषिसंस्कृतीने त्याला पूजनीय स्थान दिलेले दिसते. नागापासून संरक्षण या कल्पनेसोबतच घराण्याचा वास्तुपुरुष म्हणूनही नागाविषयी ख्याती आहे.’ दक्षिण कोकणातील बहुतांश घराच्या माजघरामध्ये खासकरून ज्या ठिकाणी गणपतीसाठी राखीव जागेजवळच नागप्रतिमा कायमस्वरूपी लावलेली पाहायला मिळते.
श्रावणातल्या नागपंचमीला नागाची पूजा होते तशीच वारुळाच्या पूजेचीही प्रथा दक्षिण भारतामध्ये आढळून येते. ‘चल गं सये वारुळाला, नागोबाला पूजायाला’ यांसारख्या गीतांमधून वारूळ आणि नागांचा अन्योन्य संबंध लक्षात येईल. असे म्हणतात की, परशुरामाची माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेणुकेचा संबंध वारुळाशी आहे. रेणुका ही वारुळातून जन्मली आणि वारुळामध्येच अखेर अदृश्य झाल्याची कथा सांगितली जाते. वारुळाच्या पूजेची उत्पत्ती बहुधा या कथेतूनच आलेली असावी. ‘रेणुका’ ही ग्रामदेवता असल्याचेही उल्लेख सापडतात. तिला ‘पृथ्वीदेवता’ असेही म्हटले आहे.
याशिवाय ‘रेणुका’ या शब्दाचे मूळ रूप रेणू म्हणजे लहान किंवा सूक्ष्म कण. त्यापासून शब्द तयार झाला ‘रेणुका’. याअर्थी पाहू जाता वारूळ हे मातीच्या सूक्ष्म कणांनी तयार झालेले असते. त्याचा विशिष्ट असा काही आकार नसतो. मातीचाच वापर करून बांधलेले – जमीन किंवा पृथ्वीशी संबंध सांगणारे हे वारूळ म्हणजे भूमातेचे एक निराकार स्वरूप म्हणता येईल. पावित्र्याचा संबंधदेखील वारुळाशी जोडला गेलेला पाहायला मिळतो. धार्मिक कार्यामध्ये पाच ठिकाणची माती पवित्र मानली जाते, त्यामध्येही वारुळाच्या मातीचा समावेश होतो.
सिंधुदुर्गामधील ग्रामदेवता असलेल्या सातेरीचे प्रतीकही वारूळ आहे. हिलाच ‘भूमका’ असेही एक नाव आहे. वारूळरूपी सातेरी देवता ही सप्तमातृका संप्रदायापैकी एक किंवा त्यांचा समुदाय असावी, असे मत पं. महादेवशास्त्री यांनी व्यक्त केले आहे. मातृकापूजनाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचेच प्रतिबिंब कोकणातील सातेरी संप्रदायामध्ये पडलेले दिसून येते.