Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीविधानसभाध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड, १६४ मतांनी विजयी

विधानसभाध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड, १६४ मतांनी विजयी

मुंबई (हिं.स.) : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारला पहिला मोठा विजय मिळाला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयासाठी १४५ मतांची आवश्यकता होती.

नार्वेकर यांना १६४ मते मिळाली. म्हणजे विजयासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा १९ मते अधिक मिळाली. तर शिवसेना उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळून त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. गेल्या वर्षी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. तेव्हापासून उपसभापती नरहरी झिरवाळ कार्याध्यक्षाची भूमिका बजावत होते.

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृहात केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ सदस्यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना अध्यक्षीय आसनावर विराजमान केले.

गैरहजर आणि तटस्थ राहिलेले सदस्य

आज झालेल्या निवडणुकीदरम्यान भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे प्रकृती अस्वास्थामुळे गैरहजर राहिले. समाजवादी पक्षाचे दोन आणि एमआयएमचा एक, अशा तीन सदस्यांनी मतदानात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मनसेच्या राजू पाटील आणि बहुजन विकास आघाडीच्या तीन सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान केले. दरम्यान १२ आमदार अनुपस्थित राहिले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, अनिल देशमुख, दत्ता भरणे, निलेश लंके, अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते, बबन शिंदे, भाजपाचे मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप, कांग्रेसच्या प्रणिती शिंदे, रणजीत कांबळे आणि एमआयएमचे मुफ्ती इस्माइल शाह यांचा समावेश होता.

नार्वेकर यांच्याविषयी….

राहुल नार्वेकर यांचा जन्म दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते तरुण वयात राजकारणात आले. ते मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. नार्वेकर हे ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झालेले ते विधानसभेचे आजवरचे सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होते. नार्वेकर यांनी आपला राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू केला होता. त्यानंतर तीन वर्षे ते राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य होते. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि कुलाबा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत. नाईक हे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सभापती आहेत. त्यामुळे दोन्ही सभागृहांच्या सर्वोच्च पदावर आता सासरे-जावई यांची जोडी दिसणार आहे. नार्वेकर यांच्या घरातील सदस्यही राजकीय क्षेत्रात आहेत. नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. तर भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक २२७ मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. राहुल यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर प्रभाग क्रमांक २२६ मधून नगरसेविका आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -