Monday, July 15, 2024

ऑक्सिजन

प्रा. प्रतिभा सराफ

दिवसा झाडे ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बनडायऑक्साइड, हे आपण सर्वच शाळेत शिकलेलो असतो! पण शाळेत असताना मला नेहमी प्रश्न पडायचा की, दिवसा झाडे ऑक्सिजन सोडतात तेव्हा आपण ऑक्सिजन घेतो. पण रात्री कार्बनडायऑक्साइड सोडतात, तेव्हा आपण ऑक्सिजन कसा काय घेतो? पण शाळेत असताना कधी प्रश्न विचारायची हिंमत झाली नाही. एक तर वाटायचं की, मित्रमैत्रिणी हसतील आणि दुसरं म्हणजे त्या संदर्भात बाईंनी काही अजून उलटेसुलटे प्रश्न विचारले, तर आपल्याला त्याची कशी उत्तर देता येतील?

असो. तर महत्त्वाचं हे की, मी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेकडे वळले त्यामुळे अगदी अकरावीपासून एच टू ओ म्हणजे H2O म्हणजेच पाणी! त्यामुळे पाणी बनण्यासाठी ऑक्सिजन लागतं, हे कॉलेजमध्ये मनावर बिंबवले गेले. कधीतरी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ऑक्सिजनचे सिलिंडर पाहिलेले होते. माझ्या ओळखी-पाळखीच्या कोणाला ऑक्सिजन लावलाय, हे काही आठवत नाही. हो… अलीकडे ब्यूटीपार्लरमध्ये सर्वात महागडे फेशियल ऑक्सिफेशियल असते. फेशियलमधून ऑक्सिजन कसं काय चेहऱ्यामध्ये घातले जाते हे, काही कधी अनुभवले नाही. त्यानंतर क्वचितच ‘ऑक्सिजन’ शब्द कधी कानावर गेला असेल!

आताच्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले कारण ऑक्सिजनअभावी माणसं पटापट मरायला लागली. ऑक्सिजनचे महत्त्व माझ्यासहित सामान्यांपासून अगदी राजकारण्यांपर्यंत सर्वांच्याच लक्षात आले.

आता कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना ‘झाडे जगवा, झाडे वाढवा’ या सरकारी कार्यक्रमाअंतर्गत काही स्लोगन आम्ही पाट्यांवर लिहून आणि नंतर त्याचा घोषवारा केला होता. आयुष्यभर फुकटॅ ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना आपण कापून टाकतो, तर काही क्षणांसाठी ऑक्सिजन पुरवणाऱ्या डॉक्टरांना खूप सारे पैसे देतो आणि देव मानतो! असे काहीसे. त्या दिवशी रात्रभर ‘ऑक्सिजन’ न मिळाल्यासारखी मी तळमळत राहिले.

एके दिवशी माझ्या मित्रानं मला विचारलं की, एकाचा वाढदिवस आहे आणि त्याला कविता खूप आवडतात, तर तू त्याला कविता म्हणून दाखवशील का? मी विचारलं की, कुठे जायचं आहे? ‘आपल्या घरापासून अर्धा तासाच्या अंतरावर. कविता म्हणायची आणि परत यायचं. मोजून दीड तास जाईल!’ मला ‘नाही’ म्हणता आलं नाही. माझा मित्र मला एका वृद्धाश्रमात घेऊन गेला. त्या आजोबांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील सर्व माणसं एकत्रितपणे साजरा करत होते. कोणीच कोणाचे नातेवाईक नव्हते. मी माझ्या कवितांचा कार्यक्रम तिथे केला. हो… हे सगळे दीड तासात आटपले असते. पण त्यादिवशी मी तिथे पाच तास घालवले आणि मला ‘ऑक्सिजन’ या शब्दाची खरी किंमत कळली!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -