नवी दिल्ली (हिं.स) : कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून अलीकडच्या काळात, आरपीएफ -रेल्वे सुरक्षा दलाला महत्त्व प्राप्त झाले आहे. एप्रिल २०१९ पासून एनडीपीएस कायद्यांतर्गत शोध, जप्ती आणि अटक करण्याचे अधिकार रेल्वे सुरक्षा दलाला देण्यात आले आहेत. या बेकायदेशीर व्यापारावर निर्बंध घालण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांमध्ये ते सक्रियपणे सहभागी झाले आहे.
रेल्वेमार्गे अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध संपूर्ण भारतात, ऑपरेशन “एनएआरसीओएस” (नार्कोस) या सांकेतिक नावाखाली जून-२०२२ मध्ये महिनाभर एक मोहीम राबवण्यात आली. अंमली पदार्थ आणि मनोवस्थेवर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या धोक्याकडे लक्ष वेधणे हा या मोहिमेमागचा हेतू होता. या मोहिमेअंतर्गत आरपीएफ ने भारतीय रेल्वेद्वारे अंमली पदार्थांचे वाहक/वाहतूकदार यांच्या विरोधात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
आरपीएफ ने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि इतर कायदा अंमलबजावणी संस्थांच्या समन्वयाने या बेकायदा व्यापारात गुंतलेल्या मादक पदार्थांच्या तस्करांना शोधण्यासाठी देशभरातील गाड्यांमध्ये आणि निश्चित केलेल्या ठिकाणी तपासणी तीव्र केली. जून २०२२ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाने रु. ७,४०,७७,१२६ रूपये किमतीच्या डिझायनर उत्पादनांसह विविध अंमली पदार्थ जप्त केले आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या १६५ व्यक्तींना अटक केली आहे. तसेच त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या ताब्यात दिले आहे.