श्रीनिवास बेलसरे
पॅत्रीशिया हायस्मिथ यांची १९५० साली प्रकाशित झालेली कादंबरी ‘स्ट्रेंजर्स ऑन अ ट्रेन’ ही आल्फ्रेड हीचकॉक यांना खूप आवडली. त्यांनी फार्ले ग्रँजर, रुथ रोमन आणि रॉबर्ट वॉकर यांना घेऊन या कादंबरीवर १९५१ साली त्याच नावाचा सिनेमा काढला. आपल्याकडे त्या कथेवर बेतून आणि भारतीय वातावरणासाठी कथानकात आवश्यक ते बदल करून, बी. मित्रा यांनी ‘शर्त’(१९५४) हा कृष्णधवल सिनेमा दिग्दर्शित केला होता. यात शामा, दीपक, शशिकला, आय. एस. जोहर इ. प्रमुख भूमिकेत होते.
सिनेमातील एस. एच. बिहारी यांच्या गीतांना कर्णमधुर संगीत दिले होते हेमंतकुमार यांनी. शमसूल हुदा बिहारी, अर्थात एस. एच. बिहारी यांनी हिंदी आणि उर्दूतून असंख्य गाणी लिहिली. त्यांचे बंगाली भाषेवरही प्रभुत्व होते. त्यांची १९५४ पासून सुरू झालेली कारकीर्द १९८९ पर्यंत चालली. बिहारी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुंदर गाणी दिली. ‘कश्मीरकी कली’मधील ‘दिवाना हुआ बादल’ ‘इशारो इशारो में दिल लेनेवाले’ ‘तारीफ करू क्या उसकी, जिसने तुम्हे बनाया,’ किंवा ‘ये रात फिर ना आयेगी’ मधील ‘यही वो जगा हैं, येही वो फिझा हैं, यहापर कभी आप हमसे मिले थे’, ‘मेरा प्यार वो हैं के मरकर भी तुमको जुदा अपनी बाहोसे होने न देगा’ किंवा १९६८च्या किस्मतमधील ‘आंखो में कयामतके काजल होठोपे गजबकी लाली हैं’, ‘लाखो हैं यहा दिलवाले, और प्यार नही मिलता’, शमशाद बेगम आणि आशाताईंच्या आवाजातले ‘कजरा मुहब्बतवाला आखियो में ऐसा डाला’, किंवा मिथुन चक्रवर्ती आणि पद्मिनी कोल्हापुरेच्या प्यार झुकता नहीमधील, ‘तुमसे मिलकर ना जाने क्यो, और भी कुछ याद आता हैं.’ अशी अगणित गाणी आजही रसिकांच्या लक्षात आहेत.
प्रसिद्ध संगीतकार ओ. पी. नैय्यर तर त्यांना ‘शायरे आझम’ म्हणत. जावेद अख्तरही एस. एच. बिहारी यांना ‘रोल मॉडेल’ मानत असत. इतक्या मोठ्या कवीची आठवण आज कुणालाही नाही याबद्दल जावेद अख्तर यांनी एकदा खंत व्यक्त केली होती.
‘शर्त’मधले हेमंतकुमार यांनी गायलेले एक गाणे खूप लोकप्रिय झाले होते. प्रेमाच्या उन्मादात प्रेमिक एकमेकांना किती गोड आश्वासने देत असतात. (नंतर भलेही काहीही होवो.) त्याचे हे गाणे म्हणजे एक सुंदर उदाहरण! त्या प्रेमाच्या उत्कट क्षणी दोघांनाही एकेक शब्द किती खरा वाटत असतो!
न ये चाँद होगा, न तारे रहेंगे,
मगर हम हमेशा, तुम्हारे रहेंगे,
न ये चाँद होगा…
प्रेमाला प्रतिसाद मिळाला आणि ते सफल झाले की कोण आनंद मनात भरून राहतो. कोणत्याच दु:खाची जाणीव महत्त्वाची वाटत नाही. सगळे काही ठीकठाक आहे, असे वाटते. ‘आप तो ऐसे ना थे’, मधील निदा फाझली यांच्या ‘तू इस तरहा से मेरी जिंदगीमे शामिल हैं’ या गाण्यातल्या ओळीसारखी मन:स्थिती बनते –
ये आसमान, ये बादल, ये रास्ते, ये हवा,
हर एक चीज हैं,
अपनी जगह ठीकाने पे,
कई दिनो से शिकायत नहीं जमानेसे,
ये जिंदगी हैं सफर, तू सफर की मंजिल हैं.’
मात्र ‘न ये चांद होगा, ना तारे रहेंगे’ या गाण्याचे मोठे विचित्र वैशिष्ट्य आहे. म्हणजे ते अशा वेळी म्हटले गेले आहे की, जेव्हा प्रियकर स्वत:च थोड्या वेळाने प्रेयसीला पोलिसांच्या स्वाधीन करून देणार आहे. दुसऱ्याच क्षणी आपण कायमचे वेगळे होणार आहोत, हे नायक दीपकला माहीत असते! तो एक प्रामाणिक पोलीस अधिकारी असतो आणि जी आपली प्रेयसी आहे, तिच्यावर खुनाचा आरोप आहे. जिला आपण शोधत होतो ती हीच आहे, हे त्याला त्याक्षणी समजलेले असते!
एकीकडे कर्तव्याची कठोर जाणीव, तर दुसरीकडे प्रियेच्या कायमच्या ताटातुटीचे दु:ख अशी त्याची गोंधळलेली मन:स्थिती आहे. तो जरी गाणे तिला संबोधित करत असला तरी खरे तर स्वत:च्या मनाचीच समजूत काढतो आहे.
बिछड़कर चले जाएं तुमसे कहीं,
तो ये ना समझना मुहब्बत नहीं.
जहाँ भी रहे हम तुम्हारे रहेंगे,
न ये चाँद होगा…
त्याच्या विचित्र परिस्थितीमुळे त्याच्या डोळ्यांतून चक्क अश्रूधारा येत आहेत. आपले दु:ख तिला सांगूही शकत नाही आणि तिच्याबद्दल वाटणारे उत्कट प्रेम आवरूही शकत नाही, अशा कोंडीत त्याचे मन तडफडते आहे. एकीकडे अपार प्रेम आणि दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्याचा निर्धार त्याला अस्वस्थ करतो आहे. म्हणून तो म्हणतो –
ज़माना अगर कुछ कहेगा तो क्या,
मगर तुम न कहना हमें बेवफ़ा
तुम्हारे लिये हैं तुम्हारे रहेंगे,
न ये चाँद होगा…
त्याने तिच्याबरोबरच्या आयुष्याची अनेक स्वप्ने पाहिली होती. तिच्याकडून प्रेमाची पावतीही मिळाली होती. मात्र नियती काहीतरी भलतेच त्यांच्या भाळी लिहून बसली होती. एकवेळ प्रेमात अडथळा येईल, हे त्याकाळी सर्वानीच गृहीत धरलेले असायचे. पण परस्परांशी एकरूप होऊन जगण्याची शक्यता अगदी तोंडाशी आलेली असताना मीलनाच्या सगळ्या शक्यताच संपाव्यात, ही नियतीने केलेली क्रूर चेष्टा आहे, हे त्याच्या लक्षात येते आहे.
ये होगा सितम हमने पहले न जाना,
बना भी न था, जल गया आशियाना,
कहाँ अब मुहब्बत के मारे रहेंगे…
कधीकधी अशा जुन्या भाबड्या कथा, अशी मनस्वी प्रेमगीते आणि मनात वर्षानुवर्षे रेंगाळत राहणारे त्यांचे संगीत मनाला केवढातरी दिलासा देऊन जाते. म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!