मृणालिनी कुलकर्णी
ऑलिम्पिक, एशियाड… अन्य कोणताही क्रीडाप्रकार पाहताना आपण मनाने, शरीराने तेथेच असतो. पुढे काय होईल? याचा नकळत आपल्यावरही ताण येतो. अनेक वर्षांचा सराव, त्यासाठी अनेक गोष्टींचा केलेला त्याग, त्या देशाचे हवामान/खाणे जुळवून घेतानाच आपल्या देशबांधवांच्या अपेक्षा, या साऱ्याचा स्पर्धकाच्या मनावर ताण/दडपण येते. प्रत्यक्ष आव्हानाच्या वेळी अंगी असलेले कौशल्य इतरांनाच नव्हे, तर स्वतःलाही पटवून देण्याच्या वेळीच मनावर येणारा ताण/दडपण का व कसे येते? त्याला तोंड कसे द्यावे, ते कमी कसे करावे, आपली कामगिरी कशी उंचावावी? याचा विचार क्रीडा मानसशास्त्राचे तंत्रज्ञान करते. याच तंत्राचा उपयोग करून १९७२/७६ च्या ऑलिम्पिकमध्ये रशियाने वर्चस्व सिद्ध केले होते. हे मानसशास्त्र मूलतः भारतीय योगशास्त्रावर आधारित आहे.
दुर्दैवाने सामन्याच्या वेळी येणारे दडपण हाताळण्याची अशी तंत्रपद्धत उपलब्ध आहे, हेच मुळी संबंधितांना माहीत नाही. मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भीष्मराज बाम स्वतः खेळाडू, प्रशिक्षक, त्यांचा मानसिक सराव तंत्रज्ञानाचा अभ्यास होता. भारतीय जागतिक अजिंक्यवीर ओम अग्रवाल, अशोक पंडित, जसपाल राणा, मनशेर सिंग, अंजली वेदपाठक म्हणतात, “आमच्या यशात बाम सरांच्या तंत्राला अनन्यसाधारण स्थान होते.”
मॅरेथॅानपेक्षा अवघड मानल्या जाणाऱ्या अत्यंत दमछाक करणाऱ्या ट्रायथलॉनसाठी १६ वर्षांच्या पीटर हकीमने भारतातर्फे १९९४ च्या शर्यतीत १५०० मीटर पोहणे, ४० किलोमीटर सायकल व १० किलोमीटर धावणे हे सारे एकापाठोपाठ असणाऱ्या स्पर्धेत बर्फाचे वादळ असताना, जिद्दीने मानसिक सरावाची सर्व तंत्रे योग्य प्रकारे वापरून सर्व पुरुष गटात पहिला क्रमांक मिळवला होता.
सराव तंत्रज्ञान खेळाडूची मानसिक ताकद वाढविते. आपलं मन ही फार मोठी शक्ती आहे. आपल्याजवळील ज्ञानाचा – कौशल्याचा साठा अंतर्मनात बंदिस्त असतो. त्या साठ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकाग्रता लागते. आपले मन भूत आणि भविष्यकाळात भटकत असल्याने प्रतिकूल परिस्थितीत पहिला बळी जातो एकाग्रतेचा. तेथे वर्तमानकाळातील संवादी विचार आणून विचाराचे वळण बदलावे लागते. त्यासाठी एका शब्दाचा किंवा छोट्या वाक्याचा उपयोग करतात. जसे – “मी देवाला फूल वाहत आहे.” या विधानाने मनातले इतर चित्रण थांबते.
‘मार्ग यशाचा’ या पुस्तकात बाम सर लिहतात, “मानसिक सरावात पहिला टप्पा ‘का’चा विचार केल्यावर मग ‘कसे’ या टप्प्याकडे वळतो. युवकांनो! कोणतीही गोष्ट करताना ती उत्तम होण्यासाठी आपण ती ‘का’करतो याचा विचार पक्का हवा. ते आव्हान तुम्ही का निवडले आहे आणि ते पेलणे तुमच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे आहे, ते एका कागदावर दोन-चार वाक्यात, त्यासाठी तयारी कशी केली? किती त्याग केला? लायकी कशी मिळविली, हेही दोन-चार वाक्यात आणि जे साध्य करायचे आहे ते प्रत्यक्ष घडले, हे समजून कल्पना करून कागदावर लिहून काढा. काम चालू ठेवा. लिहिलेला मजकूर वाचताना तुमची आत्मप्रतिमा उंचावेल. प्रत्यक्ष कौशल्य प्रगट होणे वा न होणे, हे आत्मप्रतिमेवरच अवलंबून असते. म्हणूनच झालेल्या चुका सुधारल्यानंतरच्या कामगिरीचे चित्रण मनात बिंबायला हवे.”
लॅनी बॅशाम यांनी रायफल शूटिंगमध्ये ६०० पैकी ५९८ गुण मिळवून जागतिक उच्चांक केला होता. एकाने विचारले, “कोणत्या चुकीमुळे दोन गुण गेले?” ते म्हणाले, “त्या चुकाचे चित्रण मी मनात ठेवत नाही.”
बाळ ठाकरे यांनी राजला एक चित्र दाखवले व म्हणाले, “चुका बघू नकोस परिणाम बघ.” (यातला डिफेक्ट घेऊ नको इफेक्ट घे.) म्हणूनच प्रक्षिशक/पालक/हितचिंतक यांना विनंती आहे, सारखे चुकांकडे लक्ष वेधून तुला हे जमणार नाही; तू अगदी मठ्ठ आहेस असे ताशेरे मारू नका.
कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी शरीर आणि मन ही दोन महत्वाची साधने आहेत. शरीराची साथ नसतानाही मनाची तीव्र इच्छा असेल, तर… खेलरत्न दीपा मलिक. पाठीच्या कण्यातील ट्युमर काढल्याने छातीखालील भाग लुळा पडला. शरीराला व्यायाम म्हणून पोहायला सांगितले, त्यातून जलतरण स्पर्धा. त्यांचे थंड पाण्यात पाय आखडून जात. मग हातातील ताकदीने दिव्यांगांच्या गोळा/थाळी/भाला फेक स्पर्धा, नंतर हिमालयातील मोहिमेत सर्वाधिक उंचीवर मोटार बाईक चालविली… ही अपंगांपलीकडील क्षमता केवळ आणि केवळ मानसिक ताकदीमुळे शक्य होते.
हीच मानसिक ताकद शरीरसंपदा सुधारण्यासाठीही उपयोगी पडते. कॅन्सर झाला हे कळताच क्षणभर हबकलो. लगेच मनानी त्या आजाराचा स्वीकार केला. झालेल्या कॅन्सरला परतवून आज अभिनेता शरद पोंक्षे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे आपल्या कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
स्पर्धा परीक्षा संबंधित भूषण गगराणी म्हणतात, “शैक्षणिक पद्धतीमध्ये बौद्धिक स्तर गाठणाऱ्याची संख्या हजारांत-लाखांत आहे. त्यामुळे यशाचा मार्ग हा बौद्धिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमतेच्या कसोट्यामधून जातो. अपयश/नकार पचवायलाही मानसिक ताकदच मोठी असावी लागते.”
१९४५ साली सिडनीच्या गुंडेर हेग यांनी एका मैलासाठी ४ मिनिट १.४ सेकंद ही वेळ नोंदवली. अनेक वर्षे कोणीही हा विक्रम न मोडल्यामुळे अॅथलेटिक्स जगतात असा विश्वास निर्माण झाला की, कोणीही व्यक्ती चार मिनिटांत एक मैल पळू शकत नाही. प्रयत्न केल्यास शारीरिक त्रास होईल. रॉजर बिन्नी स्वतः एक डॉक्टर, त्याच्या मनाने हा अडथळा नाकारला. ६ मे १९५४ त्यांनी स्वतः एक मैल अंतर ३ मिनिट ५९.४ सेकंदात कापले. त्यानंतर १६ धावकांनी ते अंतर चार मिनिटांच्या आत कापले. रॉजर बिन्नी म्हणाले, “मानसिक अडथळे तोडले की, तुम्ही तुमच्या कार्यात नवनवे विक्रम स्थापू शकता.”
रवींद्रनाथ टागोर म्हणतात, “माझं संकट निवारण करावं, अशी माझी प्रार्थना नाही, तर प्रतिकूल परिस्थिती पेलण्यासाठी आत्मबल दे.” शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मनाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, मानसिक ताकद वाढविण्यासाठी ‘द माइंड जीम’ ही आजच्या काळाची गरज आहे. “व्यायामशाळा, पण मनासाठी…!”
[email protected]