Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाजभक्तीच्या प्रांगणात

भक्तीच्या प्रांगणात

प्रियानी पाटील

भगवान विठ्ठलाचे रूप जाणताना अभंग, टाळ-मृदंगाच्या माध्यमातून जशी पंढरी दुमदुमते तसंच अवघ्या महाराष्ट्रात सप्ताहाच्या रूपाने वेध लागतात ते विठुरायाच्या भक्तीचे. टाळ-मृदंगाच्या गजरात आसमंत दुमदुमतो. विणेची तार छेडली जाते. अवघ्या जनांच्या मुखात अभंगांचे शब्द गुणगुणले जातात आणि तल्लीनता गाठली जाते. अशीच विठ्ठलाच्या भक्तीची तल्लीनता गाठलेली एका क्षणी अनुभवास मिळाली.

तिच्याकडे अभंगांचे पुस्तक नव्हते, तर ओठी अभंग वसलेले अनेकदा पाहण्यात आलेले. तिची तल्लीनता न्याहाळताना भक्तीचे रूप डोळ्यांत उमटले. सप्ताहाच्या रूपाने आषाढी एकादशीच्या चार दिवस अगोदर विठुरायाच्या मंदिराला उजाळा यायचा. गजराच्या नादाने जो तो तल्लीन होऊन जायचा. आषाढीला उपवासाचं एक देणं पुऱ्या घराला लाभलेलं असायचं. त्यात हिचा उपवास अगदी शुद्ध असायचा. केसावरून आंघोळ, हातात माळा, पूजा होईपर्यंत तिची तल्लीनता वाखाणण्यासारखी असायची. तिच्या अक्षरात विठ्ठलाचे अभंग कागदावर उतरवले जायचे. ओठी ती गुणगुणायची. नवीन अभंगांना चाली लावायची. तिच्या आवाजाचा सूर गाठला जायचा. सप्ताहाच्या वेळी कोणता अभंग गायचा. कोणता गजर घ्यायचा, हे तिने सकाळपासूनच ठरवलेले असायचे. सारं काही पक्कं असायचं.

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला… म्हणताना अनेकजणींचे सूर मंदिरात दुमदुमायचे. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी…! आणि सुरात सूर, फेर धरून टाळांचा गजर आणि तल्लीनता वाखाणण्याजोगी असायची. यावेळी साऱ्याजणी अशा काही समरसायच्या की, ही आषाढीची सात दिवसांची वारीच वाटून जायची. प्रत्यक्षात विठुरायाच्या पंढरीला कुणी जाऊन आलेले नव्हते, कुणाला जायला भेटेल हे ठाऊक नसतानाही विठुरायाच्या आपल्या नजीकच्या मंदिरात मात्र विठुरायाच्या नामाचा गजर करून जो तो तल्लीन होताना दिसायचा.

‘जनी नामयाची रंगली कीर्तनी… तेथे चक्रपाणी धाव घेई…’ या अभंगातून संत जनाबाई देखील भेटायची आणि चक्रपाणी श्री विष्णू अर्थातच श्री विठ्ठलाचे रूपही धावून आलेले असायचे. हिच्या अभंगाच्या वहीतला हा आवडता अभंग. सगळ्याजणी एकरूप होऊन गायच्या, सुरात सूर मिसळायच्या. हिला पण मग हुरूप यायचा. प्रहर संपून ही घरी आली तरी तिच्या मुखात एक ना एक अभंग असायचाच. भक्तीचं रूप म्हणजे काय, तर हिच्याकडून अनुभवावं अशीच होती ती.

जसं विठ्ठलाचं रूप तिच्या अंतरी वसलेलं असायचं तसं तिचं मनही तितकंच शुद्ध आणि सर्वांना मदत करणारं होतं. फावल्या वेळी हिचं अभंग पानावर उतरवणं सुरू असायचं, तर कुणी मैत्रीण घरी आली, तर तिच्याशी गप्पा मारताना देवादिकांच्याच गोष्टीत ती तल्लीन होऊन जायची. पंढरपूरला जाणं सोपं नाही. कारण एसटी लागायची. प्रवास झेपायचा नाही तिला. त्यामुळे काहीशी खंत होती तिच्या मनाला. पण एकदा तिची मैत्रीण पंढरपूरला जाऊन आली तेव्हा तिने विठ्ठलाच्या द्वारी तिचे चरण लागले म्हणून हिने मैत्रिणीच्या पायावर डोके टेकवून नमस्कार केला. मैत्रीणही केवढी आनंदी झाली होती. मैत्रीण कुणा शेजाऱ्यांसमवेत पंढरपूरला जाऊन आलेली. येताना प्रसाद आणलेला. तो हिला दिला. तो खाऊन ही धन्य झाली. तिच्या चेहऱ्यावर मोठी प्रसन्नता लाभली. मनाचं पावित्र्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं. जणू हिला तिच्या मैत्रिणीच्या रूपाने विठ्ठलच भेटला.

ही पंढरपूरला न जाताही… प्रत्यक्षात विठुरायाला न भेटताही केवढी आनंदी आणि समाधानी झाली. ती तल्लीन झाली असतानाही हिच्या मैत्रिणीचं मन मात्र काहीसं विषण्ण झाल्यासारखं जाणवलेलं. का कोण जाणे, ती खिन्न झालेली.

“काय झालं, पंढरपूरला जाऊन आलीस, विठुरायाला भेटलीस तरी मन उदास का तुझं?” हिने आपल्या मैत्रिणीला विचारलं, तेव्हा मैत्रिणीच्या मनाचा बांध फुटला. म्हणाली, “पंढरपूरला गेले काय आणि अनेक तीर्थक्षेत्रं केली काय? मला माझ्या घरात आपलेपणा नाही. जसा तुला आहे. तुझी सून तुझी केवढी काळजी घेते, तसं माझं नाही. तुझं मन किती प्रसन्न आहे, तसं माझं नाही. माझी नातवंडं माझ्याशी बोलतही नाहीत. मुलगा, सून विचारतही नाही. अभंग मनात असला तरी माझ्या ओठी येत नाही. पंढरपूरला विठ्ठलाला डोळे भरून पाहिलं तरी भक्तीची तल्लीनता मनासारखी मला लाभली नाही. सारखी खंत लागून राहिलीय मनाला. म्हातारपण खूप वाईट आहे माझं.” मैत्रीण भडाभडा बोलली, तशी ही केविलवाणी झाली. मनाला लागलं काहीसं, ती म्हणाली, “तू काळजी करू नकोस होईल सारं नीट.”

“नीट काहीच नाहीये… मी अशीच उपऱ्यासारखी राहते माझ्या स्वत:च्याच घरात. जिथे माणसं एकमेकांना विचारत नाहीत तिथे कसलं घरपण आलं?” मैत्रीण केविलवाणी झाली. तशी ही उदास झाली. म्हणाली, “विठुरायाच्या चरणी तल्लीन हो. अभंग गा, मन रमव भक्तीत. तुझ्या माणसांना तू आपलंसं कर, ती तुझ्याशी बोलत नसतील, तर तू त्यांच्याशी बोल. नातवंडांना काम सांग, सुनेकडे काही स्वत:हून खायला करून माग. तिच्या पदार्थांचे गोडवे पण गा. सुनेला जराशी का होईना कामात मदत करते सांग आणि थोडी मदत कर देखील. सकाळी देवपूजेत मन रमव. नाही काही जमत, तर एखादं पुस्तक वाच. मुलाला बालपणीच्या गोष्टी, आठवणी सांग, मग बघ कसे तुझ्याशी बोलतात की नाही.” हिचं सांगणं. तशी ती म्हणाली,

“ते आता काही शक्य नाही. कारण मी जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हाच घरातून मला हाकलली. घराच्या बाजूला गोठा आहे, तिथे माझं सामान टाकलंय आणि आल्यापासून मी तिथेच राहतेय. कर्म माझं दुसरं काय.” मैत्रिणीचा सूर गहिवरला. हिचं काळीज हेलावलं. “मग आता?” हिचा प्रश्न.

मैत्रीण म्हणाली, “मी कधीतरी येईन तुझ्याकडे. मला फक्त अन्नाला नाही म्हणू नकोस. कुणाकडे जाऊ मी?”
तशी ही म्हणाली, “कुणाकडेही जाऊ नकोस. इथेच ये. मी तुला अन्नाला नाही म्हणणार नाही.” लगेचच तिने सुनेला सांगून मैत्रिणीला जेवायला दिले. सोबत धान्याची शिदोरी दिली. आपल्या दोन इस्त्रीच्या साड्या तिच्या पिशवीत टाकल्या आणि तिने स्वत:च्या अक्षरात लिहिलेली अभंगांची पानं तिच्या हातात दिली. म्हणाली, “हे अभंग पाठ कर, चालीत म्हण, तल्लीन होऊन जाशील.”
दुसऱ्या दिवशी ही मंदिरात गेली, तेव्हा मैत्रीण हातात पिशवी घेऊन मंदिरात आलेली. खांद्यावर विणा घेऊन अभंगाची तार तिने छेडली. पण आज मैत्रीण एकटी नाही आलेली, तर तिच्यासोबत तिची नात आणि सूनही होती. त्यांना पाहून ही आश्चर्यचकित झाली काहीशी. तिने नजरेने मैत्रिणीला विचारले, “हे कसे काय शक्य झाले…”

मैत्रीण म्हणाली, “मला विठ्ठल पंढरपूरला नाही, तर तुझ्या रूपानेच भेटला. मी गोठ्यात बसून अभंग म्हणताना, कसा कोण जाणे सुनेला पाझर फुटला. गोठ्यात अन्नाचे घास खाताना मुलाचं मन गहीवरून आलं. तुझ्या नातवंडांनी इस्त्री करून दिलेल्या घडीच्या साड्या बघून माझ्या अंगावरल्या लक्तराची मुलगा-सुनेला जाणीव झाली. माझी नात मला येऊन बिलगली. आता माझी जागा गोठ्यात नाही, घरात आहे. आज मंदिरात मला सून आणि नात घेऊन आली.” मैत्रिणीच्या सांगण्यावर हिने तिच्या सुनेकडे पाहिलं, तर सून काहीशी अपराधी भावनेने खाली मान घालून राहिलेली. यापुढे अशी चूक होणार नाही, हेच अविर्भाव दिसले तिला तिच्या चेहऱ्यावर… भक्तीच्या प्रांगणात अजून तरी काय हवं होतं तिला. तिने विठुरायाला हात जोडले इतकंच!

priyani.patil@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -