Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजदत्तक पालकांची आर्थिक फसवणूक

दत्तक पालकांची आर्थिक फसवणूक

अॅड. रिया करंजकर

लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याला व सासरच्या आणि माहेरच्या लोकांना अपेक्षा असते, ती संसार वेलीवर फूल फुलण्याची. कोणीतरी आपल्याला आई-बाबा म्हणणारे असावे, असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं. मुलांच्या जन्मानंतर पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट होतं. असा थोरामोठ्यांचा समजही आहे. प्रत्येक जोडप्याच्या नशिबी आई-बाबा होणे शक्य नसतं. दोघांमध्ये कोणातरी एकाला कुठला ना कुठला वैज्ञानिक दोष आढळतो. काही लोक सायनचा आधार घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना जन्म देतात. टेस्ट ट्यूब बेबी म्हणा किंवा सरोगेसर पद्धतीने आज-काल मुलं जन्माला येऊ लागलेली आहेत. पण याचा खर्च प्रत्येक जोडप्याला परवडेल, असा नाही म्हणून काही जोडपे दत्तक मूल घेऊ लागली आहेत.

दीपक व दीपा मध्यमवर्गीय कुटुंब. दीपक व दीपा यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली तरी त्यांना मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी अनेक डॉक्टरांकडे वेगवेगळ्या तपासण्याही केल्या. घराच्या थोरा-मोठ्यांच्या सांगण्यावरून देवाचे काम करून बघितलं. पण त्यांच्या नशिबी आई-बाबा होणं नव्हतं म्हणून हे जोडपं खूप निराश झालेलं होतं. त्यांच्या घरी राधा ही घरकाम करणारी बाई होती. ती झोपडपट्टीत राहणारी अशी साधी सरळ बाई होती. दीपक आणि दीपा यांच्या दुःखाची तिला जाणीव होती. तिच्या झोपडपट्टीत राहणारी आशा नावाची एक स्त्री होती. तिला तीन-चार मुलं होती आणि आताही एक मूल जन्माला येणार होतं. परिस्थितीमुळे तिला हे मूल नको होतं. कारण अगोदर तीन-चार मुलं तिला होती. या आशाची परिस्थिती राधाला माहीत होती. आशाने राधाला, “तू तुझे मूल दत्तक दे, असा सल्ला दिला. त्यामुळे तुझा आर्थिक फायदा होईल”, असे तिने सांगितलं आणि त्याच वेळी राधाने दीपक आणि दीपाला तिचं मूल दत्तक घ्या व तिला आर्थिक सहाय्य करा, असं सांगितलं व दीपक आणि दीपाची ओळख राधाने आशाशी करून दिली. मूल जन्माला आल्यानंतर सर्व खर्च दीपक आणि दीपाने उचलला व आशाला आर्थिक मदत करून ते मूल रीतीरिवाजाप्रमाणे दत्तक घेतलं.

कायदेशीर नोंद न करता दत्तकग्रहणाचा विधी करून मुलाला त्यांनी दत्तक घेऊन ताबा घेतला. त्यानंतर ते मूल आपल्या घरी घेऊन आल्यानंतर ते स्वतःचेच मूल आहे, अशा प्रकारे दोघेजण त्याच्यावर माया आणि प्रेम करू लागले. त्याच्या सगळ्या हौशीनवशी पुरवू लागले. दीपक आणि दीपा यांना आपण आई-वडील झालो, या आनंदात त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागले. दीपाचा सर्व वेळ त्या मुलापाशी जाऊ लागला. त्यांच्या घरात बाळगोपाळ नांदू लागला. एक-दोन वर्षांनी आशाने दीपा व दीपकला धमकी दिली की, “माझं मूल मला परत पाहिजे, नाहीतर मला पाच लाख रुपये द्या”, मूल आपल्यापासून दूर होईल या धास्तीने दोघांनी आशाला पाच लाख रुपये दिले. तरी आशाची हौस भागेना. तिने अजून रक्कम उकळायचा विचार केला आणि दीपक व दीपाच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये “माझ्या मुलाला अपहरण करून एका जोडप्याने ताब्यात ठेवलेले आहे”, अशी कंप्लेट आशाने केली. “मुलाची फसवणूक करून मुलाला ताब्यात घेतले. किडनॅपिंग केले आहे”, असे आरोप पोलिसांनी दीपक व दीपावर लावले. दीपक आणि दीपाने मध्यस्थी असलेल्या राधाला पोलीस स्टेशनला बोलावले असता राधाने हात वरती केले व “आपला या गोष्टीची काही संबंध नाही”, असं सरळ सरळ सांगितलं, तर दीपक आणि दीपाला कायदेशीर अटक करून पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं व कितीतरी काळानंतर या जोडप्याला जामीन मिळाला. आज ते जरी जेलच्या बाहेर असले तरी त्यांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. जे मूल दीपक आणि दीपाने दत्तक घेतले होते, ते मूल आता आशाकडे आहे. सुशिक्षित असूनही दीपक आणि दीपाने दत्तक घेताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता दत्तकग्रहण विधी पूर्ण करून मुलाला दत्तक घेतले व कायद्याच्या कचाट्यात सापडले. याचा फायदा आशाने घेतला व आपला आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी एका निष्पाप जोडप्याला व मायेच्या पोटी आसुसलेल्या दाम्पत्याला कायदेशीर प्रकरणात अडकवून त्यांची फसवणूक केली. आज हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता, लोकांवर चुकीचा विश्वास ठेवून, शॉर्टकट मार्गाचा अवलंब करून, सुशिक्षित लोक अशी कायद्याच्या कचाटात सापडली जातात आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही मार्ग राहत नाही.

(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -