Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेख‘महाराष्ट्राचा एकनाथ’

‘महाराष्ट्राचा एकनाथ’

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे दिला आहे.

सुकृत खांडेकर

महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनवर शपथ घेतली तेव्हा अनेकांचे डोळे विस्फारले होते. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष अशा युतीचे सरकार स्थापन झाले आहे.

ठाकरे गटातून चाळीस आमदार बाहेर पडल्याने महाआघाडी सरकारचे बहुमत संपुष्टात आले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या चाळीस शिलेदारांनी पुकारलेल्या संघर्षात महाआघाडी नेस्तनाबूत झाली. पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार, अशी भाषा करणाऱ्या ठाकरे यांना अडीच वर्षांत वर्षा सोडून मातोश्रीवर परतावे लागले.

ठाण्यात रिक्षा चालविणारा एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, याचा आनंद ठाकरे यांना व्हायला पाहिजे होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट शिवसैनिकाला स्वत: जाऊन, पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन करायला हवे होते. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसावा, हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न ठाकरे यांनी नव्हे, तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करून दाखवले, इथेच भाजप विरोधकांची गोची झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील असे जाहीर केले, तेव्हापासून ठाकरे गटाची सेना पूर्ण गोंधळलेली आहे. त्यांना कळत नाही की, त्यांचे सरकार पडलं आहे की आलं आहे?

फडणवीस, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, अशा भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकार पडणार, अशी भाकिते वर्तवली होती. आम्ही सरकार पाडणार नाही, तर ते अंतर्गत विरोधामुळे पडेल, असेही भाजपने वारंवार म्हटले होते. तरीही स्वत: ठाकरे हे शरद पवार व सोनिया गांधींच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदाच्या आसनावर चिकटून होते. एकदा तर ते मुलाखत देताना म्हणाले, “भाजपला माझे सरकार पाडायचे आहे ना, चला आजच पाडून दाखवा. माझी मुलाखत चालू असताना पाडून दाखवा, कसलं ते ऑपरेशन लोटस… लोटस छे… आम्ही त्यांना लोटलं आहे.” त्यावर देवेंद्र मिष्किलीने म्हणाले, “सरकार पाडून दाखवा, असे ते सारखे म्हणत आहेत. पण एक दिवस असा येईल सरकार पडले तरी त्यांना समजणार नाही.” अखेर ठाकरे यांची इच्छा पूर्ण झाली, २९ जून २०२२ रोजी रात्री त्याचे सरकार कोसळले…. शरद पवारही महाआघाडी सरकार पाच वर्षे स्थिर राहील म्हणून निश्चिंत होते. एकदा ते म्हणाले, “राज्यात बहुमत नसताना भाजपचे सरकार आणणे हे अमित शहांचे कौशल्य आहे, त्यांच्या कौशल्याची महाराष्ट्रात वाट पाहत आहे.” आज ना उद्या तीनचाकी ठाकरे सरकार पडणारच होते. शिवसेनेतील आमदारांनाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकारमध्ये राहणे पसंत नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना संपवायला निघाली आहे, हे सेनेच्या नऊ मंत्र्यांसह चाळीस आमदारांना समजते, ते उद्धव ठाकरे यांना का समजले नाही?

मध्य प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली, तेथे भाजपचे सरकार आले. महाराष्ट्रात शिवसेनेत मोठी फूट पडली, त्याचा परिणाम इथे सत्तांतर झाले. सत्तेवर असलेल्या नेत्यांना आपल्याच पक्षाचे आमदार संभाळता येत नाहीत, त्याला भाजप काय करणार? १९७८ मध्ये शरद पवारांनाही चाळीस आमदार फोडून वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले व पुलोद सरकार स्थापन केले होतेच. छगन भुजबळ यांनीही शिवसेनेतून अठरा आमदार फोडून काँग्रेसचा रस्ता पकडला होताच. महत्त्वाचा फरक हा की, सत्ताधारी पक्षातील आमदारच मुख्यमंत्र्यांना सांगतात की, “महाआघाडीतून बाहेर पडा व भाजपबरोबर सरकार स्थापन करा”, असे राज्यात प्रथमच घडले. उद्धव यांना नशिबाने मिळालेले मुख्यमंत्रीपद संभाळता आले नाही, हे महाराष्ट्राने बघितले. एकनाथ शिंदेसारख्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद देऊन भाजपने ठाकरे गटाचा आवाजच बंद केला आहे. आता उद्धव ठाकरे म्हणतात, एकनाथ हा शिवसैनिकच नाही. कठीण काळात मदत केली म्हणून एकनाथ शिंदे व चाळीस आमदार हे भाजपशी भावनिकरीत्या जोडले गेले आहेत. त्यांनी जे धाडस दाखवले त्यामुळे शिवसेनेला विधानसभेत अक्षरश: खिंडार पडले. चाळीस आमदार पक्ष सोडून जातात व पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान देतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. ठाकरे गटाचे झालेले नुकसान भरून येणे खूप कठीण आहे. एकनाथ शिंदे गटाने म्हटले की, आमचीच शिवसेना खरी आहे, तर कोणाला राग संताप कशासाठी यावा? एकनाथ यांच्यावर शिवसेनाप्रमुखांचे संस्कार आहेत व धर्मवीर आनंद दिघेंच्या शिकवणुकीतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, याची कल्पना कुणीच केली नव्हती. जे आमदार सूरत व गुवाहाटीला गेले, त्यांच्या बॅनर्स व कार्यालयांची मुंबई व राज्यात तोडफोड करणारे शिवसैनिकही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच भांबावले.एकनाथ शिंदे यांच्या व गटाच्या पाठीशी भाजपने आपली ताकद भक्कमपणे उभी केली आहे. देवेंद्र हे तर मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार होते. उद्धव यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र यांच्या साक्षीने भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत जल्लोष केला होता. मिठाई वाटली होती. पण पक्षाचा आदेश मानून त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या मनाच्या मोठेपणाची महाराष्ट्रातील सत्तांतराच्या इतिहासात नोंद राहील. महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुका जवळ आल्या आहेत. चाळीस हजार कोटींचे बजेट असलेली मुंबई महापालिका हा शिवसेनेचा प्राण आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अशा प्रमुख महापालिकेतून शिवसेनेला सत्तेवरून हटवणे हा भाजपचा अजेंडा आहेच. त्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचा मोठा उपयोग होऊ शकतो.

गेली आठ वर्षे महाराष्ट्रात भाजप विरुद्ध शिवसेना आणि फडणवीस विरुद्ध ठाकरे हा संघर्ष चालू आहे. गेल्या अडीच वर्षांत तर भाजप-ठाकरे यांच्यात कटुता कमालीची वाढली आहे. फडणवीस हे सत्तेसाठी उतावीळ आहेत, असा प्रचार महाआघाडीने अडीच वर्षे चालवला होता, पण आता फडणवीस यांनीच राज्याच्या किल्ल्या एकनाथ शिंदेकडे सोपवून एका शिवसैनिकावर विश्वास दाखवला. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले. ठाकरे यांच्या हातून सरकार तर गेलेच, पण आता पक्ष सांभाळून ठेवणे हेच त्याच्यापुढे मोठे आव्हान आहे. येणाऱ्या काळात शिंदे विरुद्ध ठाकरे असे मथळे झळकल्यास आश्चर्य वाटायला नको.

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे दिला आहे. हिंदुत्वाची भूमिका घेऊन झेंडा फडकवणाऱ्या ५० आमदारांनी ठाकरे सरकारला सत्तेवरून हटवले, याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद राहील.

sukritforyou@gmail.com

sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -