डॉ. वीणा सानेकर
मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास घडण्याकरिता आपली भाषा सहाय्यकारी ठरते, हे निर्विवाद सत्य आहे. त्याकरिता वर्गात शिक्षक आणि घरात पालक काय करतात, हे महत्त्वाचे. मुले एकसाची निबंध का लिहितात? शिक्षक तेच तेच विषय मुलांना लेखनाकरिता का देतात? मनातले विचार सहजपणे कसे अभिव्यक्त करता येतात? आपली अभिव्यक्ती वेगळी कशी होऊ शकते? एकच क्षण पण त्याचा अनुभव व्यक्त करताना शब्दांची निवड कशी करायची? किंवा एकाच अनुभवातून गेलेली वेगवेगळी माणसे तो अनुभव वेगवेगळ्या प्रकारे कसा व्यक्त करतात? हे असे प्रश्न स्वता:ला विचारण्यातून आपल्या आकलनाची कक्षा विस्तारते आणि त्यातून आनंद मिळतो. पण या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातला हा आनंद कसा घ्यायचा, हे शिकवले जाणे गरजेचे आहे. आमच्या उदयाचल शाळेत बाई पत्रलेखनाचे खूप वेगवेगळे विषय द्यायच्या. ढगांना पत्र, पावसाला पत्र, झाडाला पत्र अशा विषयांतून पत्रलेखन हा प्रकार अवर्णनीय आनंद द्यायचा. शाळेतून मूल जेव्हा महाविद्यालयात पाय ठेवते तेव्हा भाषेच्या विकासाचा तो पुढचा टप्पा असतो. भाषा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाला हातभार लावते म्हणून तिची मशागत शाळेत योग्य प्रकारे झाली की, पुढची वाट सोपी होते. या पुढच्या वाटेवर महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांना पुढे नेतात. अनेक उपक्रम कल्पकपणे त्यांच्याकरिता करतात.
याबाबत जुन्या पिढीतील प्राध्यापकांची किती उदाहरणे द्यावीत? आमचे प्रा. वसंत कोकजे यांनी महाविद्यालयात मराठी प्रबोधनचे बीज रुजवले. सरांनी वेगवेगळ्या स्पर्धांच्या आयोजनाला सुरुवात केली. आज सरांनी सुरू केलेले हे मंडळ भरभराटीला आले आहे. कोकजे सरांसोबत आमचे शशिकांत जयवंत भक्कमपणे उभे राहिले. त्यांच्या संकल्पना निवडीला दादच दिली पाहिजे. सरांमुळे वेगवेगळे कवी, संगीतकार, लेखक, नाटककार यांच्या निर्मितीशी आमचे नाते जुळले.
सरांनी तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल नाटकाची तिकिटे हातात ठेवली नि अशाच निमित्ताने छबिलदास, एन.सी.पी.ए. या रंगमंचांची ओळख झाली. सरांनी महाविद्यालयात विजय तेंडुलकरांच्या मुलाखतीचे ठरवले आणि मराठी नाटकाला वळण देणारा हा नाटककार जवळून पाहता-ऐकता आला. आम्ही तेंडुलकरांच्या नाटकांवरचे अनेक संदर्भ लेख यानिमित्ताने गोळा केले. त्याकरिता विविध ग्रंथालयांना भेट दिली. समीक्षक म. सु. पाटील सरांची याच कारणाने ओळख झाली. त्यांनी ‘अनुष्टुभ’चे दुर्मीळ लेख मिळवून दिले. अशा संदर्भांचे संशोधनमूल्य सहजपणे मनावर ठसले. मराठीच्या तासाला मराठी नाटकांचा प्रवास समजून घेताना ज्योत्स्ना भोळे हे नाव अभ्यासले होते. मराठी रंगभूमीच्या प्रारंभिक काळातील ही अभिनेत्री नि नायिका. केशवराव भोळे जन्मशताब्दी निमित्ताने ज्योत्स्ना भोळेबाई आमच्या महाविद्यालयात आल्या, तेव्हा मराठी रंगभूमीचा इतिहासच जागा झाला. त्यांनी सादर केलेले ‘बोला, अमृत बोला’ हे पद आजही मनात घुमते आहे.
कृष्णगीते, कुसुमाग्रजांच्या कवितांची रसयात्रा, मराठीतील प्रेमकविता अशा विविध संकल्पना आमच्या जयवंत सरांनी विद्यार्थ्यांकडून साकार करून घेतल्या. मराठी कविता, नाटक, मराठमोळे संगीत यांची दालने आमच्याकरिता उघडली गेली. या सर्व कार्यक्रमांमध्ये कला, वाणिज्य अशा विविध शाखांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. इंजिनीअरिंग, वैद्यकशास्त्र, विज्ञान, वाणिज्य कोणत्याही शाखेतला विद्यार्थी असो, भाषा त्या विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलतेची जडणघडण करते.
आमचे कोकजेसर कर्जतजवळच्या नेरळला राहायचे. जवळपास आदिवासी पाडे. या पाड्यांवरची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावी म्हणून सर कितीतरी झटायचे. आनंदवाडी, माणगाववाडी, कोतवालवाडी या भागातल्या छोट्या शाळा, अंगणवाड्यांना सर भेट द्यायचे. त्या मुलांकरिता गाणी, कविता जमवणे, त्यांना ती शिकवणे हे मी सरांच्या सहवासात शिकले. त्या मुलांना माझ्या संग्रहातल्या कविता शिकवताना त्यांची गाणी ऐकताना वेगळीच मजा यायची.
‘ठाकरं आम्ही… बोला रं बोला’ असे एका तालासुरात गाणारी ही मुले अतिशय निखळ आनंद द्यायची. त्यांच्याकरिता शब्दांची कोडी नि खेळ तयार करताना आपल्या भाषेची गंमत अनुभवता यायची. आज मागे वळून पाहताना जाणवते, माझ्या अशा प्राध्यापकांनी काही वेगळे करत असल्याचा आव आणला नाही. त्यांनी आमच्या भाषेची मशागत किती सुंदर केली. त्यांचे हे देणे माझ्या विद्यार्थ्यांना वाटण्याचा आनंद अविस्मरणीय आहे.