सतीश पाटणकर
कोकणात पावसाळा सुरू झाला की, समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किनाऱ्यावर पाग टाकून मासेमारी केली जाते. यात मिळणाऱ्या माशांचे प्रमाण अल्प असल्याने मच्छीमार ते मासे स्वत: भोजनात वापरतात. खाऱ्या पाण्यातल्या माशांची चव चाखण्यासाठी मग दोन ते तीन महिने वाट पाहावी लागते. मात्र या काळात मासेमारीची वेगळी पद्धत सुरू होते. ती म्हणजे गोड्या पाण्यातील ‘चढणीचे मासे’ पकडण्याची पद्धत.
पावसाळा सुरू झाला की, कोकणी माणसाची शेतीच्या कामाची लगबग सुरू होते. मात्र या शेतीच्या कामातूनही वेळात वेळ काढून चढणीचे मासे पकडण्याची मजा, तो दिवसा किंवा रात्री घेत असतो. कोकणातल्या बहुतांशी नद्या या प्रवाहित असल्या तरी डोंगर-दऱ्यातील पाण्यातील झरे लुप्त झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी काही नद्यांत तो कोरडा असतो. नद्यांमधील मोठ-मोठे डोह व कोंडी या पाण्याने भरलेल्या असतात. उन्हाळ्यात पाणी जसे कमी कमी होत जाते, तसे या नद्यांमधील मासे या डोहात जमू लागतात.
पावसाळा सुरू झाला की, डोंगर-दऱ्यांमधून नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेऊन येते. नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते, याला साखळी गेली म्हणतात. ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होऊन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात, तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात, छोटे पऱ्ये यामध्ये शिरतात व इथून त्यांच्या जीवन-मरणाचा खेळ सुरू होतो. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरू होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षित राहावीत, याकरिता मासे लहान-लहान ओढ्यांमध्ये शिरतात. तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात.
चढणीच्या माशांमध्ये चवीला सर्वात मस्त म्हणजे मळये, त्यानंतर शेंगटी, मग खवळा, डेकळा, दांडकी, खडस, वाळव, काडी, करजुवा, झिंगू, सुळे… तशी प्रत्येक भागात माशांची नावे वेगळी आणि चवही वेगळी… अशी मासेमारी करणाऱ्या तरुणांची-ज्येष्ठांची टोळकी ग्रुप करून येतात, मासेमारी करतात. वाटे पाडतात. काही वाटे घरी पोहोचतात, तर काही वाटे पार्टीला वापरले जातात. बऱ्याच वेळा नदीकिनारीच किंवा शेतातच पार्ट्या रंगतात. रिमझिमत्या पावसात गरमागरम माशाचे तिखले अहाहाऽऽऽ…
चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे बांधन घालणे. ओढ्यावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा) पडेल अशा पद्धतीने बांधन धरून त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो. झोतावरून वरच्या दिशेने उडी मारणाऱ्या माशाची उडी जर चुकली, तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो आणि खवय्यांचे अन्न होतो. दिवस-रात्री या प्रकारे मासे पकडता येतात. या बांधणाला दर एक तासांनी भेट द्यावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात.
पावसाची रिपरिप वाढू लागताच शेतकऱ्यांची जशी दैनंदिनी बदलू लागते तसा त्यांचा आहारही बदलतो. सह्याद्रीतील धबधबे वाहू लागतात. सह्याद्री ते सागर अशी ओहोळांची साखळी एकदा का पूर्ण झाली की, वसुंधरेचे रूपच बदलून जाते. खऱ्या अर्थाने पावसाळ्याला गती येते. ओहोळ खळाळू लागले की, एरवी उन्हाळ्यात पाण्यासाठी तहानलेल्या नदीतील कोंडी भरून वाहू लागतात. याच कोंडींमध्ये असलेले मासे आता नव्या जगात जाण्यासाठी सैरभैर धावू लागतात. जणू काही आता येथे राहणेच नको. यापेक्षाही चांगले तळे पाहूया म्हणून त्यांची शर्यत सुरू होते. खळाळत्या धबधब्यांच्या विरुद्ध दिशेने ते प्रवास करू लागतात. ही माशांची चढाओढ पाहणे म्हणजेच एक दिव्य असते. प्रवाह वाढत जातो आणि माशांची झुंबड धावू लागते, पाण्यावर उडू लागते आणि या उडणाऱ्या माशांना, सैरावैरा धावणाऱ्या माशांना पकडण्यासाठी सर्वांची एकच धावपळ.
अंधार पडल्यानंतर तर माशांची लगबग अधिकच वाढते. मग बत्तीवरची मासेमारी सुरू होते. अचानक प्रकाश पाहून मासे थबकतात आणि खवय्यांची शिकार होतात.
या माशांना पकडण्यासाठी सारेच जण सरसावतात. हरतऱ्हेची शस्त्रे बाहेर पडतात. ही शस्त्र म्हणजे या भागाची एक वेगळी ओळख आहे. डोम, आके, पागरे, हूक, भरीव बांबूच्या काठ्यांनी तयार केलेली गरी. आके (गोल छोटेखानी जाळ्याचा प्रकार), पागरे (छोटे जाळे, याला लोखंडी किंवा जस्ताचे तुकडे वजनासाठी जोडलेले असतात.) हे साहित्य बाहेर पडते. गढूळ पाण्यामध्ये माशांच्या हालचाली टिपत त्यांना पकडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न होतात. काही मंडळी नदीच्या मुख्य मोक्याच्या जागी ‘किव’ही घालतात. मासे मारण्यासाठीचा लाकडी सापळा तयार करतात. या साखळी लागण्याच्या दिवसात चढणीचे मासे मारण्यासाठी हौसे, नवसे तयार असतात. चढणीच्या माशांची मजा जेवढी सांगावी तेवढी थोडीच. माशांच्या कसरतीप्रमाणे त्यांच्या कलेने घेत अलगद पिशवीत भरणारे अनेक महाभागांची कसरत पाहण्यासारखीच असते. उन्हाळ्यात हे मासे एवढ्या संख्येने कुठे असतात? पावसाबरोबर ते बाहेर कुठून पडतात? पकडून आणलेल्या माशाचे तिकले खाण्याचा मोह कुणाला थोपविता येणार नाही. केवळ मीठ, मसाला आणि हळदीचे पान, त्रिफळ घालून माशांचे केलेले कालवण ही तर मालवणी मुलखातली चढणीच्या माशांची खास थाळी असते. या थाळीचा ज्यांनी आस्वाद घेतला, त्यांना चढणीच्या माशांची लज्जत समजेल. ज्यांनी घेतला नाही, त्यांनी सुसाट कोकण गाठावे…