रमेश तांबे
दुपारी बाराची घंटा वाजली अन् मुलांची शाळा भरली. उभे राहून साऱ्यांनी राष्ट्रगीत म्हटले. देवाजीची प्रार्थना झाली. कर्तव्याची शपथ घेतली. आता वर्गात गप्पागोष्टी सुरू झाल्या. हास्यविनोद, दंगामस्ती सुरू झाली. तेवढ्यात सर वर्गात आले. वर्ग तेव्हा पूर्ण भरत होता. गडबड गोंधळ चालू होता. सरांचा प्रवेश होताच शांतता पसरली. प्रत्येकाची नजर खाली गेली. पाटील सरांचा तास म्हणजे शिक्षांचा तास! साऱ्यांची धडधड वाढली. ते पाहून सरांनी टाळी वाजवली. सर खदखदून हसले. सारी मुले मान वर करून बघू लागली.
सर म्हणाले, “मुलांनो आजचा तास मजेचा, दंगामस्ती अन् खेळाचा.” मुले तर आश्चर्यचकितच झाली. सरांच्या एकदम प्रेमातच पडली. सर म्हणाले, “यावे पुढे एकाएकाने. येऊन सादर करावे जे आपल्याला येते. बोला, नाचा, गाणे गा. नुसतेच बसून राहू नका!” मग एका मुलाने केली हिंमत. जाऊन त्याने केली गंमत. खो-खो हसली सारी मुले, साऱ्यांचे चेहरे कसे मस्त फुलले. मग एका मुलीने ठेका धरला. सारा वर्ग गाऊ लागला. वर्गाबाहेर आवाज गेला. नंतर आला एक पहिलवान. त्याने जोरात दंड थोपटले आणि हाताने चार विटा फोडून दाखवल्या. तेव्हा टाळ्यांचा झाला एकच कडकडाट. साऱ्यांनी अनुभवला एकच थरथराट! मग आला एक चित्रकार. घेऊन रंगीत खडू चार. त्याने सरांचे चित्र भरभर काढले. चित्र बघून सर खूपच हसले. चित्र काढले हुबेहुब, सारेच म्हणाले बहूत खूब!
आता आला विनोदवीर! बोलू लागला, करामती करू लागला. वर्गात हास्याचे फवारे उडाले. पोट धरून सारे हसू लागले. टाळ्या वाजवत सर्व म्हणाले वाह रे! वाह रे! एक मुलगी जागेवरून उठली. हातात तिच्या छडी होती. छू-मंतर जादूमंतर करताच, हाती आला फुलांचा गुच्छ! पुन्हा फिरवली जादूची कांडी तेव्हा उडाली साऱ्यांची दांडी. गणिताचे पुस्तक झाले गायब, घडले वर्गात अजब गजब!
नंतर एक भित्रा मुलगा आला अन् नुसताच ठोंब्यासारखा उभा राहिला. साऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली. सरांनी मारली नावावर फुल्ली. बिचारा हिरमुसला अन् रडू लागला. डोळ्यांतून पाणी त्याच्या लागले वाहू! सर ओरडले, “गधड्या चूप”, तसा तो जोरात रडू लागला! सारी मुले त्याला हसू लागली. पण तो सारखा रडतच राहिला. जराही खंड पडला नाही त्याच्या रडण्याला. मग सारे घाबरले. साऱ्यांनी त्याला समजावले. पण तो थांबेनाच. रडून रडून तो पूर्ण भिजला. सारा वर्ग पाण्याने भरला.
पाणी वाहत वाहत वर्गाबाहेर पडले. ते थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये शिरले. पाणी बघताच मुख्याध्यापक धावले, पळतच वर्गात आले आणि म्हणाले, “काय झाले, कसे आले, कुठून आले एवढे पाणी, कोण म्हणतंय येथे रडत रडत गाणी!” मुख्याध्यापकांनी पाहिले मुलगा रडतोय. त्यामुळेच वर्ग पाण्याने भरलाय. पाटील सर मुलाला ‘माफ कर’ म्हणाले. साऱ्या मुलांनी त्याला घाबरून हात जोडले!
तसा मुलगा शांत झाला. त्याच्या डोळ्यांतले पाणी थांबले. बघता बघता वर्गातले पाणी गायब झाले. साऱ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. त्या मुलाच्या नावाने घोषणा दिल्या. मुलगा म्हणाला, “हीच तर माझी जादू होती. कसे साऱ्यांना घाबरवून सोडले.” मग मुले म्हणाली वाजवत टाळ्या, “वाह रे बाळ्या, वाह रे बाळ्या!”