पनवेल (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने पनवेल मधील दोन वेगवेगळ्या शॉपवर छापा मारुन ३ बाल कामगारांची सुटका केली आहे. तसेच या बाल कामगारांना कमी वेतनात अति श्रमाचे काम देऊन त्यांना राबवुन घेणाऱ्या दोन्ही शॉप मालकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.
पनवेल मधील बिकानेर स्वीट्स कॉर्नरमध्ये व राजेश्वरी कोल्ड्रींक्स शॉप या दोन्ही शॉपमध्ये बाल कामगारांना कामावर ठेवण्यात येऊन त्यांच्याकडून अतिश्रमाचे काम करुन घेण्यात येत असल्याचे तसेच त्यांना कमी वेतनात राबवून घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे यांनी सदर शॉपवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी पनवेलमधील एमटीएनएल रोडवरील अॅसपायर प्राईड या इमारतीत असलेल्या बिकानेर स्विट्स कॉर्नरमध्ये जाऊन पहाणी केली असता सदर शॉपमध्ये १७ वर्षीय मुलगा ग्राहकांना चहा, नाष्टा देण्याचे काम करताना आढळून आला.
त्यामुळे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बिकानेर स्विट्स कॉर्नर दुकानामध्ये कामाला असलेल्या सदर अल्पवयीन मुलाची सुटका केली. त्यानंतर सदर शॉपचा मालक रामलाल चौधरी याला ताब्यात घेतले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने पनवेल मधील कृषी उत्पन्न बाजार समिती भागात असलेल्या राजेश्वरी कोल्ड्रींक्समध्ये जाऊन पहाणी केली असता, सदर शॉपमध्ये दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुले पाण्याचे बॉक्स तसेच कोल्ड्रींक्सचे बॉक्स उचलण्याचे काम करताना आढळुन आले.
त्याठिकाणी कामाला असलेल्या दोन्ही मुलांची सुटका करुन शॉप मालक गिरीशभाई पटेल याला ताब्यात घेतले. या कारवाईतील दोन्ही शॉप मालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या शॉपमध्ये बाल कामगारांना कमी वेतनामध्ये कामाला ठेऊन त्यांच्याकडून जास्त श्रमाचे काम करुन घेऊन त्यांचे आर्थिक व शारीरीक शोषण केल्याचे आढळून आले. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने या दोन्ही शॉप मालकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात बालकांची काळजी व संरक्षण, आणि बाल आणि किशोरवयीन कामगार नियमन व निर्मुलन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली आहे.