Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमेघांनी हे गगन भरतां गाढ आषाढमासी...

मेघांनी हे गगन भरतां गाढ आषाढमासी…

ख्यातनाम दिवंगत लेखक-समी क त्र्यं. वि. सरदेशमुख यांचं महाकवी-कविकुलगुरू कालिदासावर अत्यंतिक प्रेम. त्या प्रेमातूनच ‘कालिदास आणि शाकुन्तल : एक अर्घ्यदान’ हे त्यांचं पुस्तक सिद्ध झालं आहे. या पुस्तकात त्यांनी कालिदास आणि त्याच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या नाटकाची थोरवी गायली आहे. नुकताच आषाढारंभ झालेला आहे आणि बघता-बघता आकाश मेघांनी आक्रमून टाकलं आहे, त्यानिमित्ताने कालिदास आणि त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या अर्घ्यदानाची जागवलेली ही आठवण…

डॉ. मुकुंद कुळे

ज्येष्ठ आषाढाच्या आधी येतो खरा आणि रोहिणी-मृग ही नक्षत्रे खरे तर त्यालाच बिलगून असतात. पण तरीही ज्येष्ठ काही गरजत-बरसत नाही. तो तसा स्वान्तसुखायच. पावसाळी ढगांना ‘येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा’ म्हणणारा. म्हणून तर सृष्टी चातकचोचींनी वाट पाहते ती आषाढाची. तिलाही बहुधा ठाऊक असतं – ‘गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले’ हे फक्त आषाढातच शक्य आहे… आणि तसंच होतं, स्वप्न सत्यात उतरतं. म्हणूनच आषाढाची हूल-चाहूल जरी लागली तरी निसर्गच नाही, सगळ्यांना सर्जनाचे पंख फुटतात. प्रतिमा-प्रतिकांच्या अवकाशात सर्वजण सुखेनैव संचार करू लागतात. सर्वत्र प्रतिभाविलासाचा साक्षात्कारी खेळ रंगतो… ही किमया प्रत्येकाच्या तना-मनात नवनिर्मितीचं बीज पेरणा‍ऱ्या आषाढ मासातील पावसाच्या थेंबाची असतेच; पण त्याचबरोबर कविकुलगुरू कालिदासाच्या कल्पनातीत उपमाविलासाचीही असते. ‘मेघदूता’तल्या शापग्रस्त यक्षाने आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघाकरवी आपल्या प्रेयसीला प्रेमसंदेश दिला खरा… तेव्हापासून आषाढ, कालिदास आणि ‘मेघदूत’ हे भारतीयांसाठीच नाही, तर जगभरातल्या कलाकार-रसिकांसाठी समानार्थी शब्द झाले. केवळ समानार्थी शब्द नाही, तर हे तीन शब्द सर्जनाचेच प्रतीक झाले. कारण आषाढाच्या पहिल्या दिवशी यक्षाने, म्हणजेच कालिदासाने, केवळ जलाकार असलेल्या निर्जीव घनाला सजीव कल्पून त्याला थेट आपला दूत केला. मेघाला दूत करण्याची कालिदासाची ही कल्पनाच एवढी अकल्पनीय होती की, त्यानंतर तेवढा सुरेख कल्पनाविलास दुसरा झालेला नाही. ‘उपमा कालिदासस्य’ म्हणतात ते उगीच नाही!

मात्र केवळ ‘मेघदूत’ नाही; ‘ऋतुसंहार’, ‘कुमारसंभव’, ‘रघुवंश’ ही खंडकाव्यं आणि ‘विक्रमोर्वशीयम्’, ‘मालविकाग्निमित्रम्’ आणि ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ ही नाटकं… सर्वच साहित्यकृतींत कालिदासाच्या उपमा-उत्प्रेक्षांनी बहार आणलेली आहे. विशेषतः कालिदासाची वर्णनशैली… प्रणय आणि शोक या भावना म्हणजे त्याच्या लेखनातली बलस्थानं. ती व्यक्त करताना तो आपली सारी प्रतिभाशक्ती पणाला लावतो. उदाहरणार्थ ‘विक्रमोर्वशीयम्’मध्ये त्याने रंगवलेला शंतनू आणि उर्वशीतला प्रणयरंग असो किंवा ‘रघुवंश’मध्ये छातीवर फुलमाला पडून इंदुमती मृत्युमुखी पडल्यावर अजराजाने केलेल्या विलापातील शोकात्मभाव असो… दोन्ही भाव खूप खरे वाटतात. कारण दृश्याला-प्रसंगाला विश्वासार्हता प्राप्त होण्यासाठी कलाकार आणि कलाकृतीत आवश्यक असलेला पैस कालिदास देतो. कालिदासात असलेल्या या गुणांमुळेच त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्यासारख्या लेखक-समीक्षक असलेल्या तत्त्वज्ञ व्यक्तीलाही कालिदास भावला असावा आणि त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात त्याच्या साहित्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असावा. त्यांनी घेतलेल्या या मागोव्याचं फलित म्हणजे ‘कालिदास आणि शाकुन्तल : एक अर्घ्यदान’ हे त्यांचं पुस्तक. कालिदास हा सरदेशमुख यांना, सुखदुःखाच्या प्रसंगी हाकाटी न घालताही हजर राहणा‍ऱ्या सुहृदासारखा वाटायचा. त्यामुळेच जेव्हा वयोमानामुळे कालिदासावर व्याख्यानं देण्यासाठी बाहेर पडणं बंद झालं, तेव्हा त्यांनी आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासाच्या स्मरणाचा उत्सव साजरा करण्यासाठी मित्रांनाच घरी बोलवायला सुरुवात केली. या उत्सवाला त्यांनी नावही सुरेख दिलं होतं – मित्रसंध्या!

सरदेशमुख यांनी वेळोवेळी कालिदासावरच्या व्याख्यानांच्या निमित्ताने केलेल्या टिपणांतूनच त्यांचं ‘कालिदास आणि शाकुन्तल : एक अर्घ्यदान’ हे पुस्तक साकारलं आहे. साहित्यकृती म्हणून हे पुस्तक परिपूर्ण नाही. कारण सरदेशमुखांच्या मृत्यूनंतर ते त्यांच्या अपूर्ण टिपणांतून साकार झालं आहे. मात्र सोलापूरचे कवी नितीन वैद्य यांच्या अथक परिश्रमामुळे किमान हे पुस्तक आशयदृष्ट्या आहे त्या अवस्थेत; परंतु देखण्या स्वरूपात वाचकांसमोर आलं आणि कालिदास, त्याचा काळ, तत्कालीन रंगसंकेत, जागतिक साहित्याच्या परिप्रेक्ष्यात कालिदासाचं साहित्य… अशी काहीशी वेगळी माहिती पुढे आली.

या पुस्तकाच्या पहिल्या भागात सरदेशमुखांनी रवींद्रनाथ टागोरांपासून अरविंदांपर्यंतच्या थोरांना कालिदासाने कसं वेडं केलं, त्याचं विवेचन केलं आहे. रवींद्रनाथांनी निसर्गाच्या सान्निध्यात शांतिनिकेतन-विश्वनिकेतन सुरू केलं, त्या मागे कालिदासाच्या साहित्याचीच प्रेरणा होती, असं सरदेशमुख आवर्जून सांगतात. त्यांच्या मते रवींद्रनाथांनी एक प्रकारे प्राचीन आश्रमसंस्कृतीला आधुनिक परिवर्तनाशी जोडून घेतले. याचबरोबर पाश्चात्त्य साहित्य जगतात, कालिदासाच्या साहित्यकृतींचं स्थान काय हे सांगून सरदेशमुखांनी प्रसंगी शेक्सपिअर, गटे यांच्या नाटकांशी आणि त्यातल्या पात्रांशी तुलना केली आहे. ही तुलना वरपांगी नाही, तर त्या तुलनेच्या मुळाशी तत्कालीन परिस्थिती आणि पात्रांच्या वर्तणुकीचं विश्लेषण आहे. त्यामुळे कालिदास हा केवळ लोकानुनय करणारा नाटककार होता, हा जो त्याच्यावर आरोप केला जातो, त्याला एक प्रकारे छेद देणारे हे पुस्तक आहे.

पुस्तकाच्या दुस‍ऱ्या भागात सरदेशमुखांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’ नाटकासंबंधी विस्तृत विवेचन केलं आहे. कालिदासाच्या काव्यांमध्ये जसं ‘मेघदूत’ सगळ्यात लोकप्रिय झालं, तसंच त्याने लिहिलेल्या नाटकांत ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ हे नाटक रसिकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलं. बहुधा त्यामुळे सरदेशमुखांनी त्याची ही नाट्यकृतीच विवेचनाला घेतली असावी. त्यांच्या मते ‘शाकुन्तल’ हे नाटक कालिदासाचं सर्वस्व मानलं जातं. नाट्यात्मकतेच्या दृष्टीने ते खरंही आहे. मृगयेच्या निमित्ताने वनात झालेली दुष्यंत-शकुंतलेची भेट, त्यांचा गांधर्वविवाह, परत राजधानीला जाताना दुष्यंताने आपली आठवण म्हणून तिला दिलेली मुद्रिका, गर्भ राहिल्यावर दुष्यंताकडे निघालेली शकुंतला, त्या प्रवासात नदीत पडलेली आणि माशाने गिळंकृत केलेली तिची मुद्रिका, परिणामी दुर्वासांच्या शापामुळे दुष्यंताला शकुंतलेचं झालेलं विस्मरण आणि त्याने तिला नाकारणं, पुढे कोळ्याला माशाच्या पोटात ती मु‌द्रिका सापडणं, त्याने ती दुष्यंताला देणं, त्याला आपली चूक उमगणं आणि मग मुलासह त्याने शकुंतलेचा केलेला स्वीकार… असा सारा पटच नाटकाला अनुकूल. साहजिकच कालिदासाने या कथेतील नाट्यात्मक जागा हेरल्या नसत्या तरच नवल होतं. उलट त्याने दुष्यंत-शकुंतलेची वनातली भेट आणि दुष्यंताने शकुंतलेला भर दरबारात नाकारणं या दोन प्रसंगांत प्रणय आणि शोक-मानापमानाचं असं काही मायाजाल उभं केलं आहे की, रसिकाला ते भुरळ घालतंच. ‘कालिदास आणि शाकुन्तल : एक अर्घ्यदान’ या साहित्यकृतीची खासीयत म्हणजे, सरदेशमुख ‘अभिज्ञान शाकुंतल’ची कथा सांगतानाच त्यातील प्रसंग आणि पात्रांच्या वर्तणुकीचं अतिशय मार्मिक असं विश्लेषण करत जातात.

‘अभिज्ञान शाकुंतल’ हे एक प्रकारे नियतीने रंगवलेलं नाट्य आहे. सामान्य माणसांच्या आयुष्यात नियतीचा खेळ कसा चालतो, त्याचं उत्तम सूचनच या नाटकांत आहे. त्यामुळेच शेक्सपिअरच्या नाटकांतील पात्रांशी शाकुंतलमधील पात्रांची तुलना करताना सरदेशमुख म्हणतात, “तरुण हॅम्लेट विवेकाने वागतो, तरी आपल्यावर झालेल्या घोर अन्यायाचे परिमार्जन करण्याच्या झटापटीत त्याला हिंसा करावी लागते. तसंच दुष्यन्त कितीही चांगला म्हटला, तरी समवेदन आणि संगती यांच्या संदर्भाने तो फार अविवेकी ठरतो. याच तर दैवयोगाच्या गोष्टी असतात.” म्हणजे मनुष्यप्राण्याला जरी आपल्या आयुष्यात दुःखाचे कोणतेच भोवरे नको असले, तरी ते टाकल्याशिवाय नियतीला चैन पडत नाही आणि त्याशिवाय नाट्यही निर्माण होत नाही. शेवटी सरळमार्गी सरधोपट नाटक कोणाला आवडणार?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालिदासावर आत्यंतिक प्रेम करणा‍ऱ्या सरदेशमुखांनी या नाटकातील संहितेचा एक महत्त्वाचा दोषही अधोरेखित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दुष्यंत शकुंतलेला नाकारतो आणि शकुंतला तिथून बाहेर पडते, तिथेच हे नाटक संपवायला हवे होते. त्यामुळे नाटक शोकात्म झाले असते खरे, पण त्याला अधिक नाट्यात्मक उंची प्राप्त झाली असती; परंतु तत्कालीन रंगभूमी संकेतांनुसार कालिदासाने ‘अभिज्ञान शाकुन्तल’चा शेवट सुखात्म केला. मात्र इथेच त्याचा नाट्यप्रभाव उणावतो, असं सरदेशमुख म्हणतात.

अर्थात नाटक असो वा खंडकाव्य, सर्वत्रच प्रभाव आहे तो कालिदासाच्या प्रतिभाविलासाचा. ‘नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभामता’ म्हणजे नवनवीन उन्मेष धारण करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा, अशी कवीकडे असलेल्या प्रतिभाशक्तीची व्याख्या केली जाते. ही अशी प्रतिभाशक्ती बहुधा कालिदासाच्या चरणी लीन होती. त्यामुळेच तर त्याच्या एकूणच साहित्यातील प्रातिभशैलीने दीपून जायला होतं; किंबहुना त्यामुळेच त्याच्या तोडीचा कवी झालेला नाही, असंच त्या काळात म्हटलं गेलं. त्याच्या या कवी म्हणून असलेल्या मोठेपणाचा गौरव करणाऱ्या पंक्तीही तेव्हा रचल्या गेल्या –

‘पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः।
अद्यापि तत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव॥’

म्हणजे – प्राचीन काळी कवींची गणना करताना करंगळीवर पहिलंच नाव कालिदासाचं आरुढ झालं. मात्र त्याच्यानंतर त्याच्या तोडीचा कवी न सापडल्यामुळे करंगळी शेजारच्या अनामिकेने आपलं ‘अनामिका’ म्हणजे नाव नसलेली हे नाव सार्थ केलं. एकूण कालिदासाची थोरवी सांगण्यासाठीच या सुभाषितवजा काव्यपंक्तींची निर्मिती झालेली आहे. कदाचित त्यात अतिशयोक्तीही असू शकते. मात्र कालिदासाचं साहित्य वाचल्यावर हुरळून गेला नाही, असा रसिक सापडणं विरळाच!

कालिदासाची ही वाङ्मयीन महत्ता लक्षात घेऊनच त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी ‘कालिदास आणि शाकुन्तल : एक अर्घ्यदान’ या पुस्तिकेच्या माध्यमातून कालिदासाला मानवंदनाच दिलेली आहे. आणि त्यामुळेच त्यांनी संपूर्ण पुस्तकभर कालिदासाची त्याअर्थाने वाहव्वाच केली आहे. मात्र कालिदासाच्या साहित्यावर आक्षेप घेणा‍ऱ्यांचीही कमी नाही. त्यांच्या मते, कालिदासाचं साहित्य हे लोकप्रिय असलं, तरी ते लोकोत्तर नाही. कारण ते रसिकाश्रयी साहित्य आहे. त्यात लोकानुनय आणि लोकरंजन मोठ्या प्रमाणावर आहे. अर्थात हा आक्षेप काही प्रमाणात खरा असला, तरी त्याचा अत्युच्च कोटीचा कल्पनाविलास कुणालाच नाकारता येणार नाही. त्याअर्थाने कालिदासाचं साहित्य अजरामर आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघ बरसोत वा न बरसोत, कालिदासाच्या साहित्याचे मेघ बरसतच राहणार…! माधव ज्युलियन यांच्यासारख्या भाषाप्रभूलाही तो कालिदासाचा प्रभाव टाळता आला नाही. म्हणून तर छंदोरचनेसाठी मंदाक्रांता वृत्ताचे उदाहरण रचताना ते लिहून गेले –

‘मेघांनी हे गगन भरतां गाढ आषाढमासी
होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी
तन्निःश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी?
मन्दाक्रान्ता ललित कविता कालिदासी विलासी’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -