Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीविधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे दोन व्हिप, कोणाचे ऐकणार?

विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे दोन व्हिप, कोणाचे ऐकणार?

मुंबई : सरकारला बहूमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांनी बोलविलेल्या विशेष अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात अध्यक्ष महोदय असे कुणाला संबोधले जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे. दरम्यान या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना सुनील प्रभू आणि भरत गोगावले या दोन जणांनी व्हीप बजावले आहे.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक उद्या होणार आहे. दरम्यान शिवसेनेने आपला उमेदवार उभा करून निवडणुकीची चुरस वाढवली आहे. शिवसेनेचे राजन साळवी यांना निवडुन आणण्यासाठी शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांना देखील व्हीप बजावला आहे.

तर एकनाथ शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. एकनाथ शिंदेच्या गटाने देखील या अगोदर व्हीप बजावला आहे. शिंदे यांच्या गटाने भाजप उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीप जारी केले आहे.

बैठकीत ठरली रणनीतीवर चर्चा

दरम्यान, बहुमत सिद्ध करण्याच्या स्ट्रॅटजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय खातेवाटपासंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या ‘अग्रदूत’ बंगल्यावर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते. दोघांमध्ये जवळपास सव्वातास चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीसाठी भाजपा नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचा आमदारांसोबत ‘बस’ प्रवास

आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांच्याही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत संपर्कात आहेत. त्यामुळेच, ते ५० आमदारांना मुंबईला आणण्यासाठी स्वत: गोव्याला गेले होते. एकनाथ शिंदेंचा आमदारांसमवेत बसमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. गोव्यातील हॉटेलमधून गोवा विमानतळावर येण्यासाठी सर्व आमदारांना एक बस केली होती. त्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसल्याचं पाहायला मिळालं. शिंदे यांच्याशेजारी भाजप नेते रविंद्र चव्हाण हेही होते. आपली सुरक्षा आणि मुख्यमंत्र्यांचा फौजफाटा सोडून एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसोबत बसमध्ये दिसून आले.

अण्णा हजारेंचे घेतले आशिर्वाद

एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका आणि व्हिजन मांडत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी संवाद साधतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईला येण्यापूर्वी गोव्यातील हॉटेलमधून मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अण्णा हजारेंशी संवाद साधला. यावेळी हक्काने आदेश देत जा.. असे म्हणत अण्णांना त्यांनी प्रणाम केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. यावेळी, त्यांचे विश्वासू शिलेदार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी हातात मोबाईल धरल्याचे दिसून येते. अण्णा, तुमचा आशीर्वाद असू द्यात, शुभेच्छा असू द्या. मार्गदर्शन करत राहा, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अण्णा हजारेंसोबत संवाद साधला. जेव्हा जेव्हा काही लागेल तुम्हाला, तेव्हा आदेश करत जा, राज्याच्या हितासाठी आणि जनतेला अपेक्षित असं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा आम्हाला आदेश देत जा… असेही मुख्यमंत्र्यांनी अण्णांसोबत बोलताना म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -