पारस सहाणे
जव्हार : एरवी शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या मृग किड्याचे अस्तित्व दुर्मिळ होत चालले आहे. हे किडे फारसे दिसत नाहीत, असे निरीक्षण अनेक शेतकऱ्यांनी नोंदवले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक कीटकांची गर्दी रानावनात दिसते; परंतु मृगाचा किडा या सर्वांहून आगळावेगळा दिसतो. तो शेतजमिनीला हानीकारक उपद्रवी कीटकांचा फडशा पाडतो. यामुळे जमीन पिके पेरणीनंतर आलेल्या कोंबाचे रक्षण होते. जमिनीसाठी उपयुक्त बुरशी, कवके, जिवाणूजवळ मृग किडा राहतो.
कोळी, नाकतोडे हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. पहिल्या पावसात सरी बरसताना मृग नक्षत्रात या किड्याचा प्रवेश होतो. याच काळात हा किडा दिसतो. दोन आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर हा किडा दिसेनासा होतो. मृग नक्षत्रास प्रारंभ होताच एरवी शेत शिवारात मृगचा मृग किडा हमखास नजरेस पडायचा. मृग नक्षत्रात लालभडक रंगाचा एक किडा नांगरगट कुळवट झालेल्या शेतीवाडीत किंवा बांधांवर हा हमखास दिसतो.
हा कीटक ‘मृगाचा किडा’ गोसावी पैसा किटकूल नावाने ओळखला जायचा. हा कीडा दिसू लागला की, मशागत, धूळवाफ, पेरणी आदी कामे भराभर उरकली जायची, कारण पावसाच्या जोरदार आगमनाचे संकेत या किड्याद्वारे मिळत होते; परंतु यंदा मृग नक्षत्र संपले तरी हा किडा दिसला नाही, मृग नक्षत्र संपून बुधवारी (तारखेला २२) आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला तरीही मृग किड्याचे दर्शन झाले नाही.
कसा ओळखावा?
मृग किडे हे लालभडक रंगामुळे लक्ष वेधून घेतात. हातात घेतल्यानंतर ते नाण्यांप्रमाणे स्वतःला गुंडाळून घेतात, मृत झाल्याचे भासवतात. आकार पाच ते सहा मिलिमीटर असतो. शरीराखाली आठ कोळ्याप्रमाणे तोंड असते. लाल भडक रंगामुळे इतर किडे त्यांच्यावर हल्ला करत नाहीत.