Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरपालघर जिल्ह्यात ३३ ठिकाणी वीज अटकाव यंत्रे कार्यान्वित

पालघर जिल्ह्यात ३३ ठिकाणी वीज अटकाव यंत्रे कार्यान्वित

वीज कोसळून नुकसान टाळण्यासाठी उपाय

पालघर (वार्ताहर) : पावसाळ्यात अंगावर वीज कोसळून जीवित, वित्तहानीच्या घटना अनेक ठिकाणी घडत असताना, हे नुकसान टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यात ३३ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय सरकारी इमारत, पोलीस ठाणे, रुग्णालय, विश्रामगृह अशा महत्त्वाच्या इमारतींवर ही यंत्रे बसविण्यात आली आहेत.

पालघर तालुक्यात सहा, डहाणू तालुक्यात नऊ, तर वसई तालुक्यात नऊ ठिकाणी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड आणि वाडा या तालुक्यांमध्येही काही ठिकाणी ही यंत्रे बसविण्याचे प्रस्तावित आहे. या यंत्रांमुळे विजेमुळे होणारी जीवित व वित्तहानी कमी होण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. या यंत्राच्या ३०० ते ५०० मीटरच्या परिघामध्ये वीज पडल्यास तिला अटकाव करता येणार आहे. गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात वीज पडून पालघर जिल्ह्यात ३९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्कालीन कार्यालय व जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात सध्या विविध सरकारी इमारती, रुग्णालय इमारती, महसूल कार्यालय, विश्रामगृहे, सार्वजनिक बांधकाम विभागांच्या कार्यालयांवर ही वीज अटकाव यंत्रे बसवण्यात आली आहेत. वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागांत ज्या ठिकाणी वीज पडून मृत्यू झाले आहेत किंवा ज्या भागात वीज पडते त्या भागांमध्ये अशा स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्याचे पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितले.

या ठिकाणी वीज अटकाव यंत्रे

  • डहाणू तालुका – वाणगाव आयटीआय कॉलेज, डहाणू उपविभागीय अधिकारी कार्यालय, कॉटेज रुग्णालय डहाणू, ग्रामीण रुग्णालय कासा, वाणगाव ग्रामीण रुग्णालय, तहसीलदार कार्यालय, डहाणू पोलीस ठाणे, शासकीय विश्रामगृह.
  • तलासरी तालुका – आयटीआय कॉलेज येथील ग्रामीण रुग्णालय, तलासरी तहसीलदार कार्यालय, तलासरी पंचायत समिती कार्यालय, तलासरी पोलीस ठाणे, मध्यवर्तीय प्रशासकीय इमारत, तलासरी शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, ग्रामीण रुग्णालय तलासरी.
  • पालघर तालुका – पालघर शहरातील ग्रामीण रुग्णालय, तहसीलदार कार्यालय, बांधकाम भवन, मनोर येथील वारली घाट इमारत, शासकीय विश्रामगृह.
  • वसई तालुका – उपविभागीय अधिकारी कार्यालय, विरार ग्रामीण रुग्णालय, विरार न्यायालय इमारत, वसई पोलीस ठाणे, वसई मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, वसई शासकीय विश्रामगृह, विरार येथील शासकीय विश्रामगृह, शिरसाड येथील शासकीय विश्रामगृह, वसई तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभाग क्र.१ इमारत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -