अकोला (हिं.स.) : अकोला येथील अग्रसेन चौकात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणात शिवसेनेचे माजी क्रिडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावला आहे. गुलाबराव गावंडे हे सध्या सेनेत नसून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अकोला शहरातील अग्रसेन चौकात ड्युटीवर कार्यरत असलेले वाहतूक पोलिस कर्मचारी संतोष गिरी यांच्याशी १६ डिसेंबर १९९९ रोजी गुलाबराव गावंडे यांनी वाहन थांबवल्याच्या कारणावरून हुज्जत घालून शिविगाळ केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिस कर्मचारी संतोष गिरी यांच्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलिसांनी सेनेचे तत्कालीन क्रिडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राजू मधुकर मेतकर, गजानन नामदेव बचे, हरिनारायण रामराव गावंडे अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणातील सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.डी. गव्हाणे यांनी सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना कलम ३५३ अन्वये दोन वर्षांची शिक्षा, पाच हजार दंड व कलम २९४ अन्वये २००० रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणातील इतर आरोपी असलेल्या तिघांना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली आहे. सरकारतर्फे अॅड. दिपक गोटे यांनी काम पाहिले. त्यांना सिएमएस सेलचे राम पांडे व पोलिस ठाण्याचे बळीराम चतारे यांनी सहकार्य केले.