लासलगाव (वार्ताहर) : लासलगाव – विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा पाइपलाइन दूरूस्तीसाठी १५व्या वित्त आयोगातून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आदेश करून तरतूद केलेला ६५ लाखांचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात पडून असून तो तत्काळ खर्च करावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे आदेश भुजबळ यांनी दिले होते. मात्र दोन महिने उलटूनही पाण्याची समस्यां ‘जैसे थे’ असल्याने लासलगावकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सदरचा वर्ग झालेला निधी तत्काळ खर्च करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठ्याच्या लाभार्थी गावातील पाणीटंचाई दूर होण्याबाबत २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मंत्री भुजबळ यांनी विशेष बैठक घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधीकारी, गट विकास अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण समितीचे मुख्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन अतितातडीने लासलगाव विंचूरसह सोळागावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी १५व्या वित्त आयोगातून पाइपलाइन दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याचे आदेश दिले होते.
लासलगाव २५ लक्ष, विंचूर २० लक्ष, पिंपळगाव नजीक १० लक्ष, टाकळी-विंचूर १० लक्ष असा एकूण चारही गावे मिळून अंदाजे ६५ लक्ष रुपयांची तरतूद करून तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाइपलाइन दुरुस्तीचे आदेश दिले होते. मात्र देखभाल दुरुस्ती समितीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे निधीची तरतूद असूनदेखील तो खर्च न झाल्यामुळे लाभार्थी गावातील नागरिकांना १२ ते २५ दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण अशा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, गटविकास अधीकारी संदीप कराड यांनी पाण्याचे गांभीर्य ओळखून पाइपलाइन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रकाश पाटील, ग्रा.पं. सदस्य अमोल थोरे, रोहित पाटील, शहरप्रमुख प्रमोद पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप, तालुका समन्वयक केशवराव जाधव, गणप्रमुख उत्तम वाघ, सुनील आब्बड, बाळासाहेब शिरसाठ, संतोष पवार, गणेश इंगळे, संतोष पानगव्हाणे, माधव शिंदे, रविराज बोराडे आदींनी केली आहे.