मुंबई : शिंदे गटाशी जुळवून घेण्याची मागणी काही शिवसेना खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून मागणी केली आहे. परंतू ठाकरेंकडून या मागणीला केराची टोपली दाखवल्याने शिवसेनेचे १२ खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे भाजपाच्या एका केंद्रीय नेत्याने दावा केला आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने बंडखोरी केली आणि भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले. आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार देखील वेगळा विचार करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना खासदारांच्या एका गटाने शुक्रवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यस्थी करण्याची विनंती केली. मात्र ‘आपल्या समोर येऊन बोला’, असे फेसबूकवरुन आवाहन करणा-या उद्धव ठाकरे यांनी त्या खासदारांनाही जुमानले नसल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. शिवसेना खासदारांच्या बैठकीत तीन खासदार अनुपस्थित होते. यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे. भावना गवळी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे लोकसभेत एकूण १९ तर राज्यसभेत तीन खासदार आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार पक्षातील ज्येष्ठ नेत्याने शिंदेंच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांना पक्षात सामील करुन घेण्याबाबतची विनंती केली. मात्र शिंदेंवर पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे खासदारांनी केलेल्या विनंतीला उद्धव ठाकरेंनी केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या एका केंद्रीय नेत्याने दावा केला की शिवसेनेतील आमदारांच्या बंडाचे परिणाम खासदारांवरही पाहायला मिळतील. शिवसेनेच्या १९ पैकी कमीतकमी डजनभर खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात आहेत.
दरम्यान, बंडखोरीचा परिणाम शिवसेनेच्या खासदारांच्या गटावर झालेला नसल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. उस्मानाबादचे लोकसभा खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आपण कायमस्वरुपी ठाकरेंसोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.