Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीमुंबईला पावसाने झोडपले

मुंबईला पावसाने झोडपले

जागोजागी पाणी साचल्यामुळे मुंबईकर हैराण

सीमा दाते

मुंबई : गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षा करत असलेल्या मुंबईकरांना अखेर मुसळधार पावसाने झोडपले. दरम्यान या पहिल्याच जोरदार पावसामुळे मुंबई महापालिकेचे दावे फोल ठरले आहेत. जागोजागी पाणी साचल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते.

शुक्रवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. मुसळधार पावसाने मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेचे दावे फोल ठरले असल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील सखल भागात सायन, सायन सर्कल, गांधी मार्केट, अंधेरी सब वे, मिलन सब वे, हिंदमाता परिसरात पाणी साचले होते. मात्र काही वेळातच पालिकेने पाण्याचा निचरा केला. दरम्यान सायन, गांधी मार्केट भागात पाणी साचणार नाही असा दावा पालिकेने केला होता. मात्र दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे तो दावा फोल ठरला आहे.

मुसळधार पावसामुळे सकाळी नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत जावे लागले. साचलेल्या पाण्यामुळे मुंबईत वाहतूकही खोळंबलेली होती. दक्षिण मुंबईत जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा होत्या. बेस्टची वाहतूक वळविण्यात आली होती. सायन, गांधी मार्केट, माटुंगा भागात पाणी साचते. यामुळे बेस्टची वाहतूक वळविण्यात आली होती. सायन रस्ता क्रमांक २४ ची वाहतूक ३ नंबरवर वळविण्यात आली होती. यात ३४१, ४११, २२, २५, ३१२ या क्रमांकाच्या बसचे मार्ग वळविण्यात आले होते, तर मध्य रेल्वेची वाहतूकही उशिराने सुरू होती. यामुळे मुंबईकर हैराण झाले होते.

नालेसफाईचे दावे फोल

७ मार्चला मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील नालेसफाईचा प्रस्ताव उशिराने मंजूर करण्यात आला. यावेळी उशिराने नालेसफाईची कामे हाती घेतली होती. मात्र १०० टक्क्यांहून अधिक नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला होता. मात्र शुक्रवारी सकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसाने नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे यंदाही महापालिकेचे दावे पाण्यात वाहिले आहेत.

मिलन सब-वे पाण्याखाली

पावसाळा सुरू झाला की, सगळ्यात आधी मिलन सब-वेला फटका बसतो. मात्र यंदा पावसाळ्यात मिलन सब-वे येथे पाणी साचणार नाही असा दावा पालिकेने केला होता. मात्र शुक्रवारच्या पावसामुळे हा दावा फोल ठरला आहे. हिंदमाताच्या धर्तीवर मिलन सब-वे येथे जलाशय साठवणचे काम सुरू आहे. यासाठी ३० कोटींहून अधिक खर्च करण्यात येत असून अद्यापही काम सुरू आहे. जुलैपर्यंत याचा तात्पुरता वापर करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र तरीही शुक्रवारच्या मुसळधार पावसामुळे मिलन सब-वे येथे पाणी साचले होते आणि वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला होता.

पेडर रोड येथे दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईतील पेडर रोड भागात दरड कोसळल्याची घटना घडली. मुसळधार पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री पेडर रोड भागात कॅडबरी हाऊस येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नाही. दरम्यान घटनास्थळी जिऑलॉजिस्ट भेट देणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -