उदय पिंगळे
निवृत्ती नियोजन म्हणजे वेगळे काही नसून एक अशी योजना बनवणे ज्यामुळे आपली सोनेरी वर्ष सुखात जातील. ज्यांना महागाईशी निगडित पेन्शन त्याचप्रमाणे आरोग्यसेवा मिळते, असे मोजके लोक सोडले, तर निवृत्ती नियोजन ही प्रक्रिया जितकी वाटते तेवढी सोपी नाही. योग्य योजनेची निवड, त्याचे मूल्यांकन, त्यातील बदल, आपल्याला मिळणारे उत्पन्न, घेतलेले कर्ज आणि काही किमान आर्थिक गरजा यांचा समतोल साधून काही रक्कम कटाक्षाने वेगळी करावी लागते. प्रसंगी वाढवावी लागते. त्याचप्रमाणे अनपेक्षित संकटांचाही विचार करावा लागतो. याशिवाय ही रक्कम गुंतवताना आपल्याला अपेक्षित परतावा मिळतोय का? तो भविष्यात महागाईवर मात करू शकणारा आहे का? यांचीही काळजी घ्यावी लागते, असे करत असताना होणारी एखादी चूक म्हणजे आपले आर्थिक नुकसानच! असे होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल, याचे हे चिंतन.
हे सर्व करत असताना कार्यरत असताना आपला पुरेसा टर्म इन्शुरन्स, आरोग्यविमा आणि गरजेनुसार अन्य योजना असणे गरजेचे आहे. तेव्हा या योजना घेऊन त्या विनाखंड चालू ठेवाव्यात आणि मगच गुंतवणूक करावी. यासाठी सतत वाढत राहणारे हप्ते हे खर्च न समजता जोखीम रक्षणासाठी केलेली गुंतवणूक समजावी त्यात कोणतीही तडजोड करू नये. यात आता अनेक आकर्षक योजना आल्या आहेत, त्यांचा विचार करावा. याशिवाय निवृत्तीसाठी नियोजन करताना होऊ शकणाऱ्या चुका आणि त्यावरील मार्ग विचारात घेऊ…
- निवृत्तीची योजनाच नसणे – आपल्या उत्पन्नातील किमान १०% रक्कम ही निवृत्ती योजनेसाठी कटाक्षाने बाजूला ठेवायला हवी. याची सुरुवात जितकी लवकर करता येईल, तेवढा चक्रवाढ व्याजाचा लाभ गुंतवणुकीस मिळू शकेल.
- निश्चित रक्कम किती लागेल याचा अंदाज घेता न येणे – आपल्याला सध्या किती खर्च येतो त्यावरून आहे हेच राहणीमान कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या काळात, महागाईचा भविष्यातील खर्चाचा अंदाज करू शकणारे रेडी रेकनर उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा.
- उत्पन्नाच्या प्रमाणात गुंतवणूक न वाढवणे- अनेक कारणांनी आपल्या उत्पन्नात वाढ होते उदा. नोकरीत बदलणे, वार्षिक वेतनवाढ. तेव्हा त्याप्रमाणात जर निवृत्ती नियोजनासाठी १०% गुंतवणूक करीत असाल, तर या वाढीच्या प्रमाणात गुंतवणूक वाढवावी.
- मालकाकडून देऊ केलेल्या निवृत्ती योजनांचा लाभ न घेणे- अनेक चांगल्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर तरतुदींशीवाय स्वतःच्या वेगळ्या निवृत्ती योजना देऊ करतात. या योजना ऐच्छिक असतात, त्यात काही निश्चित गोष्टींची हमी दिलेली असते.
- योजनांच्या वारसांची नोंद न करणे/बदल न करणे- विविध योजना घेतानाच त्यातील वारसांची नोंद करावी. यात काही बदल झाल्यास त्याची दुरुस्ती करावी. असे न केल्यास भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
- केवळ सरकारी योजनांवर विसंबून राहणे- भविष्यात खर्चात होणारी वाढ आणि सर्वसाधारण उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींना उपलब्ध नसलेल्या योजना याचा विचार करून निश्चित उत्पन्न देणाऱ्या आणि निवृत्तीधारकांना उपयोगी असणाऱ्या योजनांच्या भरवशावर राहू नये. या योजना प्रचलित व्याजदाराशी सांगड घालून तयार केलेल्या असतात. तेव्हा पूर्णपणे त्यांच्या भरवशावर राहू नये. सध्या केवळ ज्येष्ठ नागरिकांना वरिष्ठ नागरिक बचत योजना आणि प्रधानमंत्री वय वंदना योजना या दोनच योजना उपलब्ध असून त्यामध्ये प्रत्येकी पंधरा लाख रुपये अधिकतम गुंतवणे शक्य असून पोष्टाची मासिक प्राप्ती योजना यात जोडीदारासह अधिकतम रुपये नऊ लाख टाकता येऊ शकतात, तर रिझर्व बँक फ्लोटिंग रेट बॉण्ड कोणत्याही मर्यादेशिवाय उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंड यांच्या मासिक प्राप्ती योजना आहेत. सरकारी आणि खासगी कर्जरोखे उपलब्ध आहेत यातून मिळणारा परतावा हा ५.५% पासून ११%हून अधिक असला तरी निर्णय घेण्यापूर्वी या योजनांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.
- आपण कधीच निवृत्त होणार नाही, असा भ्रम बाळगणे – तुम्ही उत्साही आहात, अत्यंत कार्यक्षम आहात हे चांगलंच आहे. पण या उत्साहाच्या भरात आपण कायम कार्यरत राहू, पैसे मिळवत राहू आणि आपला चरितार्थ चालवू, या भ्रमात राहू नका.
- कर योजनांचा कौशल्याने वापर न करणे- करलाभ देणाऱ्या काही योजनांचा लाभ आपणास कार्यरत असताना घेता येतो. त्यामुळे करबचत तर होतेच. पण मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याने भांडवल उपलब्ध होते. त्यांचा जरूर लाभ घ्यावा.
- आपल्या पेन्शन योजना रद्द करून एकरकमी पैसे घेणे- अनेक पेन्शन योजनांना मुदतपूर्व विमोचन पर्याय असतो. यामुळे एकरकमी पैसे मिळत असतील तरी त्यामुळे भविष्यातील फायद्यास मुकावे लागते.
- एकाच कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाढवणे – अनेकदा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीचे शेअर सवलतीत दिले जातात, तर अनेकजण एखादी कंपनी निवडून आपली सर्व गुंतवणूक त्यात करतात. एकाच कंपनीवर अवलंबून राहणे. अत्यंत धोकादायक आहे.
- म्युच्युअल फंड चुकीच्या योजनेची निवड – निवृत्तीचा विचार करताना म्युच्युअल फंड जोखमीच्या अधीन राहून असे विशेष फंड किंवा फ्लेक्झीकॅप फंड तज्ज्ञांच्या सल्याने निवडता येतील.
- रिअल इस्टेट घेणे हा निवृत्ती योजनेस पर्याय नाही – रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला भरघोस भांडवली नफा आणि चांगली भाडेकमाई होईल, या भ्रमात राहू नये. अनेकदा अशी गुंतवणूक ही आपले उत्पन्न कमी करणारी गुंतवणूक ठरू शकते. यापेक्षा सध्या उपलब्ध असलेले रिट्स आणि इनव्हिट हे अधिक दमदार पर्याय आहेत.