नवी दिल्ली : एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर १९८ रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे महागाईचा दर कमी होण्यास मदत होईल. इंडियन ऑइलने १ जुलै रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
दिल्लीत ३० जूनपर्यंत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर २२१९ रुपयांना मिळत होता. ज्याची किंमत १ जुलैपासून २०२१ रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये २३२२ रुपयांच्या तुलनेत आता हा सिलिंडर २१४० रुपयांना मिळणार आहे. मुंबईत २१७१.५० रुपयांवरून १९८१ रुपयांवर, तर चेन्नईमध्ये २३७३ रुपयांवरून २१८६ रुपयांपर्यंत किंमत कमी झाली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरमध्ये मात्र तेल कंपन्यांकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.
जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर २०० रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त १२ सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा ९ कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.
यापूर्वी १ जून रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाले होते. अशाप्रकारे गेल्या महिनाभरात सिलिंडरच्या दरात ३०० रुपयांहून अधिक कपात झाली आहे. मे महिन्यात सिलिंडरचे दर २३५४ रुपयांपर्यंत वाढले होते.
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी असलेल्या १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. याआधी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अखेरचा बदल १९ मे रोजी करण्यात आला होता.