पल्लेकेले (वृत्तसंस्था) : दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या संयमी फलंदाजीमुळे भारतीय महिलांनी यजमान श्रीलंकेवर ४ विकेट राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात विजयाने केली. भारतीय संघाची गोलंदाजी विजयात महत्त्वाची ठरली.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचे दोन फलंदाज स्वस्तात परतले. खराब सुरुवात होऊनही शफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या जोडीने चांगली फलंदाजी करत भारताची गाडी प्लॅटफॉर्मवर आणली. शफालीने हरमनप्रीतची साथ अर्धवट सोडली. त्यानंतर हरमनप्रीत आणि हर्लीन देओल या जोडगोळीने भारताची धावसंख्या शतकापार नेली. हरमनप्रीतने ४४, तर हर्लीनने ३४ धावा करत भारताला विजयासमीप नेले.
शेवटी दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकार या जोडीने नाबाद खेळी खेळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ३८ षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १७६ धावा ठोकत विजयी लक्ष्य गाठले. भारताने ४ विकेट आणि ७२ चेंडूं राखून सहज विजय मिळवला. या सामन्यातील विजयामुळे भारताने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर पारितोषिकाने गौरविण्यात आले.
टी-२० मालिका जिंकणाऱ्या भारतीय महिलांनी शुक्रवारी एकदिवसीय मालिकेची सुरुवात दमदार केली. पाहुण्या संघाने यजमान श्रीलंकेला मालिकेतील पहिल्या सामन्यात सहज नमवले. दीप्ती शर्मा, रेणुका सिंह आणि पूजा वस्त्राकर या गोलंदाजांच्या तिकडीने श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. ४०.२ षटकांत त्यांचा संघ १७१ धावांवर सर्वबाद झाला. विशेष म्हणजे या सामन्यात भारताने ८ गोलंदाज वापरले. त्यापैकी दीप्ती शर्मा, रेणुका सिंह आणि पूजा वस्त्राकर यांनी अनुक्रमे ३, ३, २ बळी मिळवले.
विशेष म्हणजे कर्णधार हरमनप्रीत कौरने ७ षटके फेकून केवळ १३ धावा देत १ बळी मिळवला. भारताच्या या अप्रतिम गोलंदाजीमुळे श्रीलंकेला अवघ्या १७१ धावाच जमवता आल्या. त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाज निलाक्षी डी सिल्वाने संघातर्फे सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्या पाठोपाठ हसीनी पेरेराने ३७ आणि हर्षीथा समराविक्रमाने २८ धावा केल्या. यजमानांचे अन्य फलंदाज अपयशी ठरले.