मुंबई (हिं.स.) : क्रूझ ड्रग्स प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला क्लीन चिट दिली आहे. त्यानंतर आर्यनच्या वतीने विशेष एनडीपीएस न्यायालयात आपले पारपत्र (पासपोर्ट) परत मिळावे, यासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी १३ जुलैला होणार आहे.
आर्यन खानला गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला एनसीबीने हाय-प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. परंतु, मे महिन्यात एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून त्याचे नाव नमूद केलेले नाही. पुढे या प्रकरणात त्याला एनसीबीकडून क्लीन चिटही देण्यात आली. त्यानंतर आर्यनने विशेष न्यायालयात उपरोक्त याचिका दाखल केली.