भुवनेश्वर (हिं.स.) : ओडिशातील सुप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला आज, शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. ही रथयात्रा १ ते १२ जुलै दरम्यान चालणार आहे. ओडिशातील पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेसाठी पूजा विधी सुरु झाली आहेत.
कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा भाविकांना थेट रथयात्रेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुरी मंदिर ते रथयात्रा मार्ग आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सध्या कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यात्रेतील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
तब्बल दोन वर्षांनी या यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने या ठिकाणी लाखोंची गर्दी जमणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सकाळी ‘पहिंद विधि’ केला. या विधीमध्ये रथयात्रा सुरू होण्यापूर्वी सोन्याचा झाडूने रथ साफ केला जातो. त्यानंतर भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचा रथ जमालपूर परिसरातील ४०० वर्ष जुन्या जगन्नाथ मंदिरातून वार्षिक यात्रेसाठी रवाना होतो.
जगन्नाथ पुरीप्रमाणेच अहमदाबादमध्येही भगवान जगन्नाथांची १४५वी रथयात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत भगवान जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासह शनिवारी नगर यात्रेला रवाना होणार आहेत. जुन्या अहमदाबादमध्ये होणारी ही नगर यात्रा १९ किलोमीटरची असेल. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे रथयात्रेत प्रथमस्थानी १७ हत्ती, १०१ ट्रक सहभागी होतात.