पुणे (हिं.स.) : सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आपत्तीमध्ये समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे. एनडीआरएफने त्याचप्रमाणे लष्कराने देखील गेल्यावर्षी पुराच्या परिस्थितीत चांगले काम केले आहे. कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा.
गेल्या वर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. विशेषत: नेहमी दरड कोसळणाऱ्या जागांव्यतिरिक्त नव्या ठिकाणी या दरडी कोसळल्या. त्यामुळे यंदा देखील अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठ्या पावसाच्या वेळेस तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांना जेवण्याखाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी.
मी आणि उपमुख्यमंत्री २४ तास आपणा सर्वांसाठी उपलब्ध असून आपल्याला गतीमानतेने शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. २७५ मि.मी. पाऊस एका दिवसात पडूनही महानगरपालिकेने तसेच रेल्वेने सफाई तसेच पाणी तुंबणार नाही यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोठेही मुंबईकरांना त्रास झाला नाही व वाहतुकही व्यवस्थित सुरळीत राहिली याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,मुंबई मध्ये पावसाळा सुरू झाला की धोकादायक असलेल्या इमारती कोसळतात.प्रत्येक वॉर्ड मध्ये अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना समजतील अशा भाषेत नोटीस पाठवून या इमारती खाली केल्या पाहिजेत.जे वॉर्ड ऑफीसर ही कार्यवाही करणार नाहीत संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
तसेच ज्या भागात वर्षानुवर्षे दरडी कोसळणा-या ठराविक ठिकाणांचे सर्वेक्षण झालेले आहे.गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे नव्याने दरडी कोसळणारी ठिकाणे देखील असू शकतात याचे सर्वेक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे ते सर्वेक्षण तत्काळ करा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले.