Saturday, July 20, 2024
Homeमहामुंबईउपनगरीय रेल्वेस्थानकावरील सरकत्या जिन्यांमध्ये होणार वाढ

उपनगरीय रेल्वेस्थानकावरील सरकत्या जिन्यांमध्ये होणार वाढ

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील काही स्थानकांमधील सरकत्या जिन्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या सुविधेमुळे गरोदर महिला, ज्येष्ठ प्रवाशांना स्थानकात पोहचणे आणि बाहेर पडणे सोपे होणार आहे. दरम्यान, मार्च २०२३ पर्यंत आणखी ८६ सरकत्या जिन्यांची भर पडणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे. मधल्या काळात स्थानकातील गर्दी विभाजनासाठी नव्या पादचारी पुलांची भर रेल्वे प्रशासनाकडून घालण्यात आली. मात्र तरीही रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात आणि ज्येष्ठ, गरोदर महिलांना पादचारी पुलावर चढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने स्थानकात नवे सरकते जिने आणि उद्वाहक बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये सर्वाधिक सरकते जिने मध्य रेल्वेवर बसवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रत्येक सरकत्या जिन्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये एवढी असून रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला स्थानकांमध्ये १०१ सरकते जिने बसवण्याची मंजुरी दिली आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांमध्ये १०१ पैकी ३३ जिने बसवण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर ८६ सरकते जिने आहेत.

मध्य रेल्वेवरील कांजुरमार्ग, ठाकुर्ली, भायखळा, मुलुंड, मुंब्रा आणि इगतपुरी (प्रत्येकी दोन जिने) आणि आंबिवली (एक) तर पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी, वांद्रे टर्मिनस, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसर, वसई रोड, सफाळे, वानगाव स्थानकात सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -