आमचे आधारवड

ऐश्वर्या ब्रीद


काका नावाचे हे वटवृक्ष. ते वयाची पंचात्तरी पार करत आहे. आपल्या प्रेमळ सावलीत अनेकांना विसावा देत आहे. नव्या ऊर्जेचं, नव्या उंचीचं दर्शन घडवत आहे. आमच्यासारख्या तरुणाईला दिशादर्शक बनत आहे. कसलेला समाजकारणी म्हणून आमच्या काकांचं नाव घेतलं जातंय... म्हणूनच काका नावाच्या या वटवृक्षाला आज आधारवड म्हणून बघितलं जातंय.


एखाद्या व्यक्तीच्या विचारांचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. त्या व्यक्तीचे आचार-विचार नेहमीच आपल्याला भावतात. त्यांच्या प्रत्येक कृतीवर, बोलण्यावर, वागण्यावर पूर्ण विश्वास ठेवावासा वाटतो आणि मी किती भाग्यवंत की, अशा असामान्य व्यक्तीचा सहवास मला लाभत आहे. ती व्यक्ती म्हणजे मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष रमेश रघुनाथ शिर्के काका. काका जनकल्याणासाठी सतत धडपडत असतात. काकांचा आजवरचा प्रवास अविरत समाजकार्याने भारलेला आहे. समाजसेवेची वृत्ती त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. तो त्यांचा पिंडच आहे. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, या एकाच निस्वार्थी भावनेने ते वावरत असतात. कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणताही अन्याय सहन करायचा नाही, ही त्यांची शिकवण आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली आहे. भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे प्रथमदर्शनी करारी वाटणारे शिर्केकाका मनाने अतिशय प्रेमळ व मिश्किल स्वभावाचे आहेत. त्यांच्या बोलण्यातील आत्मीयता, आपुलकी आणि जिव्हाळा यामुळे ते प्रत्येकाला आपलेसे करतात. सर्वांवर आभाळागत माया करणारे, आधार देणारे, कोणत्याही संकटाविरुद्ध खंबीर भूमिका घेऊन मनोधैर्य वाढविणारे, असे हे आमचे काका आमचा आधारस्तंभ आहेत. वयाच्या पंचाहत्तरीतही त्यांची समाजकार्यातली तळमळ आणि कामाचा झपाटा कायम आहे.


अनेक समाजधुरीणांच्या संकल्पनेतून आणि कष्टातून निर्माण झालेल्या मुलुंडच्या मराठा मंडळ या ज्ञातीसंस्थेत चार दशकांहून अधिक काळ काका कार्यरत आहेत. संस्थेच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. बिनीचे शिलेदार म्हणून काम करून आज गेली दहा वर्षे संस्थेच्या अध्यक्षस्थानी विराजमान आहेत. स्वयंशिस्तीचे, स्वावलंबनाचे, नियोजनाचे, व्यवस्थापनाचे धडे तसेच विचारांची स्वच्छता, जनसंपर्क, सांस्कृतिक, वाचन, वक्तृत्व कौशल्य, व्यक्तिमत्व विकास अशी अनेक गुणवैशिष्ट्ये कार्यकर्त्यांमध्ये कशी रुजतील, यासाठी प्रयत्न करत आहेत. काकांची निरीक्षणशक्ती अफाट आणि अनुभव दांडगा, यामुळे संस्थेतील कार्यकर्त्यांमध्ये आदरयुक्त दरारा आहे. जीवनमूल्यांचे, संस्कारांचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणून काकांना वंदन करणारी शेकडो कार्यकर्त्यांची फळी आज संस्थेत विस्तारलेली आहे.


काकांचे समाजकार्याबाबत एक सहज सोपे सूत्र आहे. ते म्हणतात, ‘प्रत्येक कार्यकर्त्याचा एक खिसा मानाचा, तर दुसरा अपमानाचा असतो. मानाचा खिसा नेहमी रिकामा आणि अपमानाचा भरलेला असतो. सर्व अपमान गिळून निस्वार्थीपणे जो कार्य करतो तो खरा कार्यकर्ता.’ सशाचे काळीज घेऊन जगण्यापेक्षा वाघासारखे जगा, तसेच हात स्वच्छ आणि वाणी स्पष्ट असेल, तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही, अशी त्यांची आम्हाला शिकवण आहे. विविध सामाजिक उपक्रमांसाठी एक सशक्त व्यासपीठ काकांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यामुळेच मराठा मंडळाचे कार्य मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले आहे. आयुष्यभर जपलेला प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा या गुणांमुळेच काका सर्वांचे आदर्श आहेत. मराठा मंडळात ते इतके एकरूप होऊन गेले आहेत की, त्यांचे हे दुसरे घर असून या कार्यमंदिरात ते समरसून जातात. आपल्या गावातील जुन्या शाळेचे नवीन माध्यमिक शाळेत रूपांतर करताना, अनेक आव्हाने स्वीकारून अशक्य ते शक्य करून दाखविण्याची किमया काकाच करू शकतात. होतकरू व दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षित व सुसंस्कारित करण्यासाठी ते या वयातही सतत कार्यरत आहेत. काकांच्या अंगी असलेला स्पष्टवक्तेपणा, उच्च आचार-विचार, निर्णयक्षमता, जिद्द आणि चिकाटी या गुणांमुळे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांमध्ये ते लीलया संचार करतात. काकांचे ओघवत्या शैलीतील समृद्ध वक्तृत्व ऐकण्यासाठी अनेकांचे कान आतुर असतात. "माझं धुलीवंदन" या त्यांच्या पुस्तकरूपाने त्यांनी साहित्य क्षेत्रातही प्रवेश केलेला आहे. हाडाचे समाजसेवक, सच्चा आणि गुणी कार्यकर्ता म्हणून आमचे सर्वांचे लाडके काका आमच्या अंतःकरणात सदैव चिरंतर असणार. काकांच्या कार्याचा संपूर्ण वेध घेण्यासाठी खरोखरच एखादे पुस्तकही कमी पडावं. एखादी व्यक्ती जन्माला येते, ती अनेक गुणांचे पुंजके घेऊनच. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवरील विविध पैलूंनी भरलेले आयुष्य असलेले, सत्यम शिवम सुंदरमची कास धरलेले, चिवेलीचे सुपुत्र आणि मराठा मंडळाचे आधारवड, ऋषितुल्य असे असामान्य व्यक्तिमत्त्व, सर्वांचे गुरुवर्य आदरणीय मा. श्री. रमेश रघुनाथ शिर्के काका यांना आज त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!!


माऊलीसम प्रेम,
एक आधारवड,
सावलीची ऊब,
पित्याजैसी पाठराखण
आणि नवी उमेद...
गुरू...
हो... गुरूच!

Comments
Add Comment

मोदींची दूरदृष्टी: मिशन कर्मयोगी

सार्वजनिक प्रशासनाच्या क्षेत्रात भारत काहीतरी अभूतपूर्व करण्याचा प्रयत्न करत आहे. तो केवळ अधिकाऱ्यांच्या

कोकणात निवडणुकीची मोर्चेबांधणी...!

कोकणातील चारही जिल्ह्यांचा विचार करताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदेगट या दोन पक्षांचे प्राबल्य आहे.

नितीन गडकरींनीच केली डॉ. जिचकारांची कदर

नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाचे

जातीपातीच्या लढ्यात मराठवाडा भरकटतोय!

जातीपातीचे राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील जुने सत्य आहे. गेल्या अनेक दशकांपासून राजकीय पक्षांनी

मोहन भागवत : राष्ट्रनिर्माणाचा मार्गदर्शक

माझे मोहनजींच्या कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध आहेत. मोहनजींचे वडील कैलासवासी मधुकरराव भागवत यांच्यासोबत मला

नवीन प्रभाग रचना ठरणार भाजपसाठी ‘गेमचेंजर’

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना भाजपने आपल्या सोयीचीच ठेवल्याचा आरोप झाला. त्यातच