शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना स्थापन केली. बघता बघता शिवसेना छप्पन्न वर्षांची झाली. शिवसेनेचा वर्धापन दिन मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. पक्षप्रमुख व मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्तानेही शिवसेनेच्या आमदारांशी संवाद साधण्याची संधी गमावली. ‘‘आमच्यामुळे तुम्ही आहात, आमच्याशी गद्दारी करू नका’’, अशी धमकी त्यांनी याप्रसंगी दिली. वर्धापन दिनाला ‘आईचे दूध विकणारे’, अशी भाषा वापरण्याची गरज का भासली? ज्या आमदारांच्या मतदानावर राज्यसभा व विधान परिषदेत आमदार पाठवायचे, त्यांच्या भावना तरी ठाकरे यांनी समजून घ्यायला हव्या होत्या. पण शरद पवारांच्या कब्जात गेलेल्या ठाकरे यांनी शिवसेना गेल्या अडीच वर्षांत वाऱ्यावर सोडली. पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचे दु:ख त्यांना समजत नाही. त्यांच्याशी चर्चा, संवाद, गाठीभेटी कधी होतच नाहीत. आपल्याच पक्षाचे नगरसेवक, आमदार व खासदारांना भेटायला ठाकरे यांना वेळ मिळत नसेल, तर ते तरी त्यांच्या नेतृत्वावर किती काळ विश्वास ठेवतील?
शिवसेनेचे चाळीसहून अधिक आमदार आणि सेनेचे अपक्ष समर्थक असे ५० आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवतात, तरी त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी, असे वाटत नाही. मुख्यमंत्रीपद हे कोणाला कायमचे किंवा आयुष्यभर मिळत नसते. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची संख्या बघता शिवसेनेतील दोन तृतियांश आमदारांनी ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला आहे. गेले दहा दिवस महाराष्ट्राची देशभर बदनामी चालू आहे. ठाकरे यांचे काय चुकले? ठाकरे शिवसेनेला का नकोसे झाले? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाकरे सोयीचे का वाटतात? ज्या पक्षांना निवडणुकीत जनतेने झिडकराले, त्यांना ठाकरे हे त्यांच्या सोयीसाठी हवेहवेसे वाटतात. ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला फेव्हिकॉल लावल्यासारखे चिकटून बसले आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी कशाची वाट बघत आहेत? त्यांना या सत्तासंकटातून कोण वाचवणार आहे? अगदी शरद पवार त्यांच्यापुढे छातीचा कोट करून उभे राहिले, तरी ठाकरे यांना कोणी वाचवू शकत नाहीत. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे, हे उघड सत्य आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेच्या व्यासपीठावर जावेच लागते.
पन्नास आमदारांनी आपले नेतृत्व झिडकारल्यावर कोणाच्या पाठिंब्यावर ठाकरे मुख्यमंत्रीपदावर राहू इच्छित आहेत? संपूर्ण पाच वर्षांच्या टर्मसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिले. पण त्यातही मोठी गोम होती. त्याने शिवसेना मोठी होणार नव्हती, तर शरद पवार व सोनिया गांधींच्या कुबड्या घेऊन ठाकरे यांना राज्याचे प्रमुखपद संभाळावे लागणार होते व नेमके गेल्या अडीच वर्षांत तसेच झाले. गेली विधानसभा निवडणूक शिवसेनेने भाजपशी युती करून लढवली म्हणून सेनेचे निदान ५६ आमदार निवडून आले. दोन नंबरचा पक्ष म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीला सेनेला मुख्यमंत्रीपद देणे भाग पडले. पण पवारांनी मोठ्या खुबीने पक्षप्रमुखालाच मुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्यावर उपकाराचे कायमचे ओझे ठेवले. पवार आणि सोनिया यांच्या ओझ्याखाली ठाकरे तीनचाकी रिक्षा चालवत राहिले. पक्षाच्या आमदार-खासदारांची या काळात अक्षरश: ससेहोलपट झाली. ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्ण आहारी गेल्याने सेनेच्या आमदारांना आपले सरकार व आपला मुख्यमंत्री असूनही अपमान व मानहानी सहन करीत दिवस काढावे लागले.
ठाकरे भेटत नाहीत, साधी-साधी कामे करीत नाही, निधी मिळत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले. आपला पक्षच विरोधात गेला आहे, हे ठाकरे यांनाही कळून चुकले. पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा मोह त्यांना सोडवत नाही, हेच चित्र गेल्या दहा दिवसांत महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला अनुभवयाला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ५० आमदार सतत सांगत आहेत की, महाआघाडीतून बाहेर पडा. पण ठाकरे त्यांचे ऐकायला तयार नाहीत. नबाब मलिक हे गेले अनेक दिवस तुरुंगात असून त्यांचे मंत्रिपद काढायला ठाकरे तयार नाहीत. त्यांचे खातेही काढून घ्यायची त्यांची हिम्मत झाली नाही. मात्र जे शिवसेनेचे ९ मंत्री गुवाहाटीला गेले त्यांची खाती पटापटा त्यांनी काढून घेतली. शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाईचा बडगा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याना पूर्ण कवच, अशी ठाकरेंची कार्यपद्धती दिसली. जे गुवाहाटीला गेले, त्यांना ठाकरे यांनी भावनिक आवाहन करून ‘परत या’ असे सांगितले. पण कोणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. त्या आमदारांना घाण म्हटले, त्यांचे मुंबईला मुडदे येतील, अशी संभावना केली, त्यांचे बाप काढले. त्यांना परत या म्हणायचा नैतिक अधिकार तरी ठाकरेंना आहे का? ठाकरेंनी वर्षा सोडले, पक्षाच्या ५० आमदारांनाही सोडले. पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत. विधानसभेतील बहुमत चाचणी स्थगित करा म्हणून शिवसेनेने खूप आटापिटा केला. शिंदे गटानेही ठाकरे यांच्याशी चर्चेचे दरवाजे बंद केले आहेत. आता विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाणे किंवा त्याअगोदर राजीनामा देणे, हेच पर्याय ठाकरे यांना आहेत.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…