Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यनात्याला दोघांनी न्याय देणे आवश्यक!

नात्याला दोघांनी न्याय देणे आवश्यक!

मीनाक्षी जगदाळे

आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेक प्रकारची नाती आपण निभावत असतो. काही नाती आपल्याला जन्मताच प्राप्त झालेली, जुळलेली असतात ज्याला आपण रक्ताची नाती म्हणतो, तर काही नाती जीवनरूपी प्रवासात आपण निर्माण केलेली असतात, तर काही नाती काळाच्या ओघात आपोआप तयार होत असतात.

नातं कोणतंही असो ते शेवटपर्यंत निभावणे, त्याला जपणे, त्या नात्याचं संगोपन करणे दोघांची जबाबदारी असते. नात्याला सतत प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे खतपाणी घालणे दोघांचेही कर्तव्य आहे. माणूस म्हटला की, तो चुकणारच, मतभेद, वादविवाद होणारच. नात्यात दोन भिन्न व्यक्तिमत्त्व एकत्र येतात त्यामुळे त्यांच्यात गैरसमज, आरोप, प्रत्यारोप, भांडण, कलह, अबोला, रुसवा हा येणारच. एकमेकांकडून अपेक्षा करणं, अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर दुःखी होणं, कष्टी होणं, नाराज होणं नैसर्गिक आहे. कोणत्याही नात्यात स्वतःचा हट्ट पुरवला जावा, आपल्या मनाप्रमाणे समोरच्याने वागावे, आपल्याला प्रेम द्यावे, वेळ द्यावा, आपल्यासाठी समोरच्याने त्याग करावा, तडजोड करावी ही वाजवी आणि रास्त अपेक्षा प्रत्येक नात्यात असतेच.

नात्यात काही बिघडलं, बिनसलं, तर समोरच्याने माघार घ्यावी, माफी मागावी, त्याने बोलायला सुरुवात करावी, त्याने भेटायला पुढाकार घ्यावा, त्याने आपली समजूत काढावी हे प्रत्येकाला वाटते. जेव्हा कोणतंही नातं दीर्घ कालावधीसाठी टिकवायचं असतं तेव्हा दोघांनाही मनाचा, भावनांचा समतोल सांभाळणे, आपल्या भाव-भावना स्पष्टपणे मांडणे, विचारांची सुयोग्य देवाण-घेवाण होणे, दोघांनीही सकारात्मक विचारातून नातं घडविणे अत्यंत आवश्यक असते. कोणत्याही नात्यात एकमेकांना पूर्णपणे ओळखणे, स्वभाव ओळखणे, सवयी जाणून घेणे, त्यानुसार परिस्थिती हाताळणे हे खरं कौशल्य असते. कोणतंही नातं सांभाळताना एकमेकांच्या सुख-दुःखाची अडचणींची जाणीव, त्यामुळे समोरच्याची कालानुरूप बदलणारी मानसिकता आणि वागणूकदेखील विचारात घेणे आवश्यक असते. खूपदा आपण म्हणतो, ‘तो बदलला, ती पहिल्यासारखी राहिली नाही, ते पूर्वीसारखं वागत नाहीत.’ सखोल विचार केला, तर बहुतांश वेळा हे लक्षात येते की, माणसं बदलत नसतात. परिस्थिती त्यांना बदलायला भाग पाडत असते. सातत्याने समोर येणाऱ्या आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टी, कडू-गोड अनुभव, माणसांचे स्वभाव बदलवतात. अनेकदा माणूस इच्छा नसतानादेखील बदलतो. पण हे तत्कालिक, थोड्या अवधीाठी असल्यास समोरचा समजून घेऊ शकतो. दोघांतील एकजण जरी कायमस्वरूपी बदलला किंवा वेगळा वागायला लागला, तर मात्र नातं तुटायला वेळ लागत नाही.

आयुष्य जगताना सुख-दुःख पेलताना, त्रासातून जात असताना, दैनंदिन कामाचा व्याप असतानासुद्धा आपण कोणत्याही नात्यात त्यामुळे दुरावा येऊ द्यायचा नाही, हे समजणं महत्त्वाचं असतं. चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारच्या दिवसांत जर एकमेकांना सोबत केली, तर नक्कीच दुरावा निर्माण होणार नाही. आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर आपण नक्कीच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो, समोरच्याला खूष, समाधानी आणि आनंदी ठेवू शकतो. असा सर्व समतोल साधता येणे सुखी समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

आजकाल समाजात दिसते की, कोणत्याही नात्यातील ओलावा, प्रेम, बांधिलकी, प्रामाणिकपणा, सचोटी बहुतांशी संपत चाललेली आहे. नातं पती-पत्नीचं असो, मित्र-मैत्रिणीचं अथवा प्रियकर-प्रेयसीचं असो, नातं बहीण-भावाचं असो वा बहिणी-बहिणींतील, भावा-भावांतील असो वा मुलं आणि पालकांमधलं, सहकारी म्हणून नातं असो वा स्त्री-पुरुषातील मैत्रीचं, प्रेमाचं अथवा शारीरिक संबंधांचं नातं असो त्याकडे गांभीर्याने बघणारे, ते नातं प्राण पणाला लावून जपणारे कितीजण आहेत?

रक्ताची नातीसुद्धा मजबुरी म्हणून, पर्याय नाही म्हणून, पदरात पडलीत म्हणून, कर्तव्य आणि जबाबदारीचे भान ठेवून, जबरदस्तीने का होईना निभावली जातात. पण आपल्याला याही पलीकडे जाऊन भेटलेल्या व्यक्ती, आपले शेजारी, मित्र, मैत्रिणी, आपले सहकारी, आपल्यावर प्रेम करणारे, आपला वेळ हवा असणारे, आपल्यामध्ये गुंतलेले, आपला आदर करणारे, आपली गरज असणारे असे अनेकजण असतात. ज्यांच्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतोय, त्यांना टाळतोय, त्यांना तोडतोय.

आज नात्या-नात्यांत वाढत चाललेला दुरावा, एकाकी पडलेली माणसं, सर्व काही असूनसुद्धा मनात येणारी एकटेपणाची भावना कळत-नकळत आपल्या मनःशांतीवर, मानसिकतेवर परिणाम करत आहे. तरीदेखील कोणीही कोणतंही नातं टिकवायला, वाचवायला, वाढवायला पुढाकार घेत नाहीये. अहंकार, अहंपणा, गर्व, कोणाचीच गरज नसल्याचा अविर्भाव, स्वतःच्याच प्रायोरिटीला महत्त्व देणे, अत्यंत कामात, व्यापात असल्याचा दिखावा, एकमेकांना टाळण्यासाठी असंख्य कारणं, एकमेकांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अनेक सबबी आज सगळ्यांकडे आहेत. माझं सगळं कसं उत्तम, छान चाललंय, मी कसा आदर्श आहे, मी कसा सर्वांगाने सेटल आहे, मी कसा श्रेष्ठ आहे, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, कोणाच्या दुःखाशी, त्रासाशी मला काहीही घेणं-देणं नाही, हे वरवर दाखविण्याचा प्रयत्न मात्र सर्वजण करताना दिसतात. त्यातील खरे सुखी कितीजण असतात आणि इतरांशी इतकं तुसड्यासारखं वागून नेमकं काय मिळवत असतात? याउलट अनेकजण दुसऱ्याला वेळ न देणे, दुसऱ्याची कदर न करणे, त्याच्या सुख-दुःखात धावून न जाणे, त्यांना मानसिक, भावनिक आधार न देणे, याला अशी कारणे देतात की, मी स्वतःच खूप त्रासात, तणावात आहे, मला स्वतःलाच खूप समस्या आहेत, माझ्याकडे थोडाही वेळ नसतो, इच्छा खूप आहे. पण जमतच नाही आणि मला माझं थोडं झालाय का? की, मी इतरांनाही वेळ देत बसू आणि त्यांचं सांत्वन करत बसू?

नात्यातील प्रेम, आदर सहवासाने वाढते, भेटीगाठीतूनच विश्वास निर्माण होतो, एकमेकांच्या छोट्या-छोट्या भावना जपल्या, तरच व्यक्ती आपलीशी होते, छोट्या-छोट्या अपेक्षा पूर्ण करूनच नात्यांचा पाया मजबूत होतो. एकमेकांना समजून घेणे, समजावून सांगणे, त्याची छोटी छोटी स्वप्न पूर्ण करणे प्रत्येक नात्याची मूलभूत गरज आहे. दिवसेंदिवस, महिनोंमहिने, वर्षांनुवर्षे आपण एकमेकांना भेटायची, बोलायची तसदी घेत नाही, खऱ्या नात्याला किंमत देत नाही, स्वतःच्याच व्यापात आपण इतके बुडालेलो असतो की, इतरांकडे ढुंकून पहायला पण आपल्याला वेळ मिळू शकत नाही??? आपल्यावर भावनिक, मानसिक दृष्टीने अवलंबून असलेले, आपल्या सहवासासाठी आतुरलेले नात्यातील जे कोणी असेल, त्यावर आपण बिनधास्त अन्याय करत असतो.

अशी अनेक वरवरची नाती समाजात पाहायला मिळतात, जी एका दिवसात, एका महिन्यात अथवा अतिशय अल्पावधीत संपुष्टात येत आहेत. जितक्या वेगाने माणसं जवळ येतात, तितक्याच वेगाने दूरदेखील जातात. यामागील कारणं शोधली, तर असे लक्षात येते की, आपल्यातला संयम, विश्वास, धीर कमकुवत होत चालला आहे. आपण स्वतःही वेळ घेत नाहीये आणि दुसऱ्याला पण वेळ देत नाहीये. नातं समजावून घ्यायला, माणूस समजावून घ्यायलाही आपण तयार नाही. कोण चुकतंय, कुठे चुकतंय, कशामुळे कटुता येते आहे, याची कारणं शोधण्यापेक्षा एकमेकांना दोष देऊन नातं तोडण्यावरच भर दिलेला दिसतो. अतिशय अल्पावधीत एकमेकांपासून माणसं दूर जातात आणि त्यांची खंतदेखील वाटायला कोणाला वेळ नसतो. कोणाचीही मनधरणी करावी, त्याला बोलत करावं, त्याला व्यक्त व्हायला संधी द्यावी इतकी सद्सदविवेकबुद्धी पण आपल्याकडे राहिली नाहीये.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -