मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातल्या सत्ताधारी शिवसेनेला घरघर लागल्यामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने सरकारचा पाठिंबा काढल्यात जमा झाल्याने मुख्यमंत्री उद्धव यांचे सरकार अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांनी ‘येथील सर्व आमदार आनंदात आहेत. आम्ही येथे कायमचे राहणार नाही, लवकरच आम्ही मुंबईला पोहोचू’, असे स्पष्ट केले. यानंतर त्यांनी सदा सरवणकर, उदय सामंत, शहाजी बापू पाटील आणि दीपक केसरकर यांचे व्हीडिओ जारी करून येथे आमदारांवर कोणतीही जबरदस्ती नसल्याचे दाखवून दिले.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज विविध माध्यमांशी संपर्क साधत ठाकरे गटाकडून केल्या जात असलेल्या टीकेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. संजय राऊत ज्या भाषेत बोलतात त्यामुळे गुवाहाटीतल्या आमदारांच्या भावना अत्यंत तीव्र होत असून हे जास्त काळ सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही शिवसेनेतच आहोत. शिवसेनेच्या विधिमंडळ गटाचे बहुमत आमच्याकडेच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमताच्या चाचणीतून अपमानित होण्यापेक्षा स्वतःहून महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतच आम्ही सरकारचा पाठिंबा काढण्याची भूमिका मांडली आहे. राज्यपाल कोश्यारी स्वतःहून याची दखल घेतील, याची खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिंदे गटातल्या आमदारांबरोबरच शिवसैनिक तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला होता. आज त्यांनी एक पत्र जारी करत शिंदे गटातल्या आमदारांना भावनिक आवाहन केले. ‘आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनीदेखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. माझे आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या, माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा असे आवाहन ठाकरे यांनी केले.
आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. त्याआधी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याच्याही वावड्या उठल्या. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करतील, अशी चर्चा सुरू झाली; परंतु प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. मंत्रिमंळाच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
भाजप आमदार आज मुंबईत
दरम्यान, भाजपने आपल्या आमदारांना बुधवार दुपारपर्यंत मुंबईत बोलावले असून बहुमत चाचणीची वेळ आल्यास आयत्या वेळी धावाधाव नको, म्हणून भाजप नेत्यांनी हे पाऊल उचलले आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली गाठली. ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानीही त्यांच्यासोबत होते. तेथे त्यांनी केंद्रीय नेते अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांनी चर्चा केली. कायदेशीर बाबींचा विचार करून पुढील डावपेच कसे असावेत? यावर त्यांनी चर्चा केल्याचे कळते.