नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर आजच सुनावणी होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. त्यामुळे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली आहे. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने तातडीने याप्रकरणी सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
अभिषेक मनु सिंघवी यांनी अशा प्रकारे तातडीने बहुमत चाचणी बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यानंतर दोन्ही न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केली. कोर्टाने म्हटले की याविषयीची आम्हाला कागदपत्रं द्यावीत. त्यावर आम्ही आज चार वाजेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करु, असे सिंघवी यांनी म्हटले. आमच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. त्यानंतर सुनावणी झाली तर आमचे म्हणणे निरर्थक ठरेल, असे सिंघवी यांनी म्हटले. यावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला की, बहुमताच्या चाचणीसाठी अधिवेशन बोलावणे हा राज्यपालांचा अधिकार आहे, त्यात कुणी ढवळाढवळ करु शकत नाही, असे शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी म्हटले. राज्यपालाच्या अधिकारात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटले.
यावर जस्टीस सूर्यकांत यांनी आजच या प्रकरणी सुनावणी होईल. दुपारी तीन वाजेपर्यंत कागदपत्रं तयार ठेवा, असे कोर्टाने म्हटले आहे. संध्याकाळी पाच वाजता यावर सुनावणी होईल, असेही कोर्टाने म्हटले आहे.
भाजपने अविश्वासदर्शक ठरावाची मागणी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने न्यायालयाची दारं ठोठावली आहेत. भाजपच्या मागणीनंतर राज्यपालांनी आज सरकारला बहुमत सिद्ध करण्याची तारीख दिली. ती देखील उद्याची म्हणजे ३० जून. सोमवारी झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्येही बहुमत चाचणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या सोळा आमदारांवर कारवाई करू नये, असा आदेश कोर्टाने दिला होता. दरम्यानच्या काळात बहुमत चाचणीची मागणी केली तर काय करायचे असा प्रश्न सरकारच्या वकीलांनी कोर्टात उपस्थित केला होता. त्यावर तुम्ही या, आम्ही सुनावणीला तयार आहोत असे कोर्टाने सांगितले होते. याचाच आधार घेत महाविकास आघाडी सरकार म्हणजे शिवसेना आज कोर्टात पोहोचली.