Sunday, August 31, 2025

आता तरी आम्हाला सोडा हो!

आता तरी आम्हाला सोडा हो!

मुंबई : राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाला न्यायालयाने परवानगी नाकारली होती. आता तरी आम्हाला बहुमत चाचणीसाठी सोडा हो! असे म्हणत तुरुंगात असलेले माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी बहुमत चाचणीत मतदान करायला सोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. मात्र, शिवसेनेने विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बहुमत चाचणीत मतदान करण्यासाठी सोडण्यात यावे, अशी मागणी मलिक आणि देशमुख यांनी केली आहे. आज सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याचवेळेस, शिवसेनेनेही बहुमत चाचणीच्या निर्णयाला आव्हान दिल्याची याचिका सुनावणीत असेल.

यापूर्वीही आमदार मलिक आणि देशमुख यांनी राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ही परवानगी नाकारली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >