गुवाहाटी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनीच गुवाहाटीमध्ये ही माहिती दिली.
शिवसेनेचे बंडखोर आमदार आज सायंकाळी गोव्याला पोहचतील. तेथे त्यांची ताज हॉटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था केली आहे. तेथेच भाजपाचेही आमदार आहेत. त्यामुळे उद्या सकाळी नास्टा करुन ते गोव्यावरुन थेट मुंबईत येणार आहेत.
शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सूरतमधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सगळे आमदार गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले. मग तिथून ते हे सगळे आमदार आसाममधल्या गुवाहाटीत पोहोचले.