सुकृत खांडेकर
एकोणीस जूनला शिवसेनेचा छप्पन्नावा वर्धापन दिन मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये साजरा झाला. विधान परिषद निवडणूक वीस जूनला होती. शिवसेनेची मते फुटू नयेत म्हणून सेनेच्या सर्व आमदारांना याच पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले होते. समर्थक अपक्ष आमदारांचीही व्यवस्था होती. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला स्वत: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. एकीकडे वर्धापन दिनाचे ठाकरे यांचे भाषण चालू होते. पण त्याच वेळी दुसऱ्या दिवशी सूरतला जाऊन बंडाचा झेंडा फडकविण्याची तयारी पूर्ण झाली होती. राज्याचा मुख्यमंत्री व पक्षप्रमुखाला याची पुसटशीही कल्पना नसावी, याचे मोठे आश्चर्य वाटते.
विधान परिषेदेच्या निकालात महाआघाडीचा फज्जा उडाला. काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला, भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले. राज्यसभेतही शिवसेनेचा उमेदवार पराभूत होऊन भाजपचे तिनही उमेदवार जिंकले होते. मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांची सरकारवरील पकड सुटली, हे तेव्हाच उघड झाले. पण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे नऊ मंत्री व पक्षाचे चाळीस आमदार सूरत व गुवाहटीला गेले तेव्हा ठाकरे यांची पक्षावरचीही पकड ढिली झाली, हे उभ्या महाराष्ट्राला दिसून आले. शिवसेनेच्या दृष्टीने ५८ वर्षांचे एकनाथ शिंदे हे खलनायक ठरले आहेत. पण त्यांनी बंडाचा झेंडा फडकवून ठाकरे सरकारची झोप उडवली आहे. शिवसेनेच्या ५५ वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बंड आहे. आमदार गेले तरी शिवसैनिक बरोबर आहेत, असे सांगणे म्हणजे आपल्या पराभवाची कबुली टाळण्यासाठी केलेला तो युक्तिवाद आहे.
एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर ते महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) आणि नगरविकास मंत्री अशी एकनाथ शिंदे यांची वाटचाल लक्षणीय आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून विधानसभेवर चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या शिंदे यांनी शिवसेना शाखाप्रमुखापासून सार्वजनिक कामाला सुरुवात केली. धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यांना ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून संधी दिल्यापासून त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही. धर्मवीरांनी त्यांच्यातील कार्यक्षमता व तत्परता पाहून त्यांना तरुण वयातच शाखाप्रमुख म्हणून नेमले. त्यांचा एक मुलगा श्रीकांत हा आॅर्थोपेडिक्स सर्जन आहे. शिवसेनेच्या तिकिटावर कल्याणमधून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आला आहे. सन २००१ मध्ये दिघे यांच्या आशीर्वादाने शिंदे यांची ठाणे महापालिकेत गटनेता म्हणून नेमणूक झाली व तेव्हापासून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या विस्तारासाठी त्यांनी अक्षरश: स्वत:ला झोकून दिले. ठाणे जिल्ह्याचे सर्वमान्य नेते अशी शिंदे यांची प्रतिमा आहे. सर्वांसाठी सदैव उपलब्ध असलेला हा नेता आहे. कोरोना काळात अंगावर पीपीए कीट चढवून इस्पितळाच्या कोविड वॉर्डमध्येही शिंदे नियमित फिरत होते. ठाणे जिल्ह्यात सत्तेच्या परिघात राहणारे डझनभर भाई-दादा मोठे नेते आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी त्यात आपले वेगळेपण कायम ठेवले आहे. महापालिका असो की विधानसभा, शिंदे यांनी ठाण्यात त्यांचे वर्चस्व कायम आहे. २०१९ ला महाआघाडीचे सरकार स्थापन होताना शिंदेच मुख्यमंत्री होतील, असे पक्षात वातावरण होते. शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार, असे पक्षाच्या वतीने वारंवार सांगितले जात होते. पण स्वत:च उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यास त्यांचा विरोध नव्हता. पण गेल्या अडीच वर्षांत शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली, पक्ष संकुचित होऊ लागला, मुख्यमंत्र्यांचा संवाद तुटल्याने पक्ष व नेतृत्व यात मोठी दरी निर्माण झाली. त्यातूनच आमदारांत असंतोषाची बिजे पेरली गेली.
शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना होत नाहीत का? बाळासाहेबांना अटक केली म्हणून त्याचा जाब विचारणाऱ्या शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना १ वर्षासाठी निलंबित केले होते, याचे विस्मरण झाले का? मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो निरापराध मुंबईकरांचे बळी घेणाऱ्या दाऊद इब्राहिमशी थेट संबंध असणाऱ्यांचे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कसे समर्थन करू शकते? ज्यांनी शिवसेना फोडली त्या शरद पवारांच्या पक्षाबरोबर सेना सत्तेत कशी? असे प्रश्न शिंदे व त्यांचे समर्थक जाहीरपणे विचारत आहेत. गेल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांनी पक्षातील शिवसैनिकांची व पक्षाच्या आमदारांची नाराजी अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही भेटत नाही म्हणून पक्षात रोष वाढतोय, हे वेळोवेळी उद्धव यांच्या कानावर घातले.
पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडामुळे शिवसेनेच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला तडा गेला, या घटनेच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी मौन पाळले, ते पाहून शिंदेही गप्प बसले. आपल्या लेखनातून व रोज टीव्ही कॅमेरापुढे रोज एक नेता पक्षाबद्दल तिरस्कार वाढविण्याचे काम करीत आहे, याविषयी पक्षाला वेळोवेळी सावध केले. गेली चाळीस वर्षे दिवस- रात्र आपल्या परिवाराची पर्वा न करता, शिवसेना व पक्षाच्या नेतृत्वावर एक कडवट शिवसैनिक म्हणून निष्ठा वाहिली. धर्मवीर आनंद दिघे यांनी घालून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करीत त्यांनी शिवसेनेचा ठाणे जिल्ह्यात सर्वस्व पणाला लावून मोठा विस्तार केला. उद्धव यांनी आपल्या सरकारमध्ये शिंदे यांना महतत्वाचे नगरविकास खाते दिले. पण खात्याचे निर्णय घेताना, खात्यात बदल्या करताना शिंदे यांना खात्याचे प्रमुख असूनही अंधारात ठेवले जात होते. नगरविकास खात्याचे नामधारी मंत्री अशी त्यांची अवस्था नेतृत्वाने केली होती. विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याने पक्षाच्या आमदारांमध्ये असंतोष आहे, असे अनेकदा सांगून शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव यांना सावध केले होते. हिंदुत्वाच्या विचारधारेपासून पक्ष दूर चाललाय म्हणून वेळोवेळी उद्धव यांना शिंदे जाणीव करून देत होते. मदरशांना भरघोस मदत व मौलवींना पगार आणि मानधन, पण हिंदू पुजाऱ्यांना काहीच नाही, म्हणून ते अस्वस्थ होते. मुंबईतील मालवणी येथील वसाहतीतून हिंदूंचे सतत पलायन होत आहे, त्यासंबंधी गृहखात्याने काहीच कारवाई केली नाही, तरीही पक्षाचा निष्ठावान म्हणून मुख्यमंत्र्यांकडे शिंदे आशेने पहात होते. महाआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार होत राहिला आणि शिवसेनेचे पद्धतशीर खच्चीकरण चालू झाले. पण मुख्यमंत्र्यांनी कशाचीच गंभीरपणे दखल घेतली नाही. यामुळे ते कमालीचे अस्वस्थ होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील की, शिंदे हे सर्व काही निमूटपणे सहन करीत राहिले. पण महत्त्वाच्या व संवेदनशील विषयावर नेतृत्व ढिम्म राहिले. मग एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या चाळीस आमदारांना बरोबर घेऊन बंडाचा झेंडा फडकवला यात त्यांचे काय चुकले? एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे, “मरण आलं तरी बेहत्तर, हिंदुत्वासाठी कोणताही तडजोड आम्हाला मान्य नाही. हिंदुत्वाच्या विचारासाठी व बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण आले तरी बेहत्तर. आता माघार नाही.”