Tuesday, May 13, 2025

देश

आसाममध्ये ७४ हजार ६५५ हेक्टर पीक पाण्याखाली

आसाममध्ये ७४ हजार ६५५ हेक्टर पीक पाण्याखाली

गुवाहाटी (हिं.स.) : आसाममध्ये आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील ४० लाखाहून अधिक लोक या पुरामुळे बाधित झाले असून १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील ७४ हजार ६५५ हेक्टरवरील पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.


या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. कालदिया नदीला आलेल्या पुरामुळे सध्याची परिस्थिती आणि नुकसानीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बजली जिल्ह्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी भबानीपूर, बजली येथील चारलपारा नयापारा येथील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. पूरग्रस्त भागात मदतकार्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे आत्तापर्यंत १३४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


दरम्यान, हळूहळू आसाममधील पुराची स्थिती सुधारत आहे. काही भागात अद्यापही पुराचे पाणी आहे. बहुतांश नद्यांची पाणीपातळी कमी होत आहे. मात्र, नागावमधील कोपिली, कछारमधील बराक आणि करीमगंजमधील करीमगंज आणि कुशियारा धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत.


विमानाच्या माध्यमातून सिलचर शहरातील पुराचा नकाशा तयार करण्यासाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण केले जात आहे. विविध भागातील नुकसानीचे मूल्यांकन करुन भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी ते कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यास मदत होऊ शकते. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मागच्या दोन दिवसांत दोन वेळा सिलचरला भेट देऊन शहरातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतल्याची माहिती कचारचे उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी दिली.


आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळे ७९ रस्ते आणि पाच पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सहा बंधारे तुटले आहेत. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे ७४ हजार ६५५ हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे. आतापर्यंत २ हजार ७७४ जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. दरम्यान, बॉलीवूड अभिनेता आमिर खान याने या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीला २५ लाख रुपयांची देणगी दिली.

Comments
Add Comment