Monday, August 25, 2025

शिवसेनेचे सरकार गेल्यातच जमा : नारायण राणे

शिवसेनेचे सरकार गेल्यातच जमा : नारायण राणे

मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदेसह जवळपास ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून वापरल्या जात असलेल्या इशाऱ्यांचा केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे सरकार गेल्यातच जमा असल्याची टीका केली आहे. आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्याबाबत बोलताना नारायण राणे यांनी युवराजांनी धमक्या देणे बंद ठरावे, असा इशारा दिला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते, मंत्री एकनाथ शिंदे व नाराज आमदारांसह आसामच्या गुवाहाटीत मुक्कामी आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आमदारांनी बंडखोरी केल्याने मविआ सरकार धोक्यात आले आहे. यातच भाजप नेते नारायण राणे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

एअरपोर्टवरून उतरले की, विधानभवनात जाणारा रस्ता वरळीतून जातो. या सर्व बंडखोरांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर नारायण राणे यांनी ट्वीट करून म्हटले की, शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणे बंद करावे. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेते बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? असे सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेकडून वापरल्या जाणाऱ्या इशारावजा भाषेचा समाचार घेतला.

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील व त्यांचे शवविच्छेदन होईल, असे विधान केले होते. त्यावर ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेत बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल?, असे म्हणत बोचरी टीका केली. ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेते बाहेर पडतील, अशा धमक्या देणे हा गुन्हा होत नाही का?’ असा सवाल नारायण राणे यांनी केला.

Comments
Add Comment