Tuesday, July 16, 2024
Homeमहत्वाची बातमीपद्मभूषण पालोनजी मिस्त्री यांचे निधन

पद्मभूषण पालोनजी मिस्त्री यांचे निधन

मुंबई (हिं.स.) : शापूरजी पालोनजी समुहाचे चेअरमन पालोनजी मिस्त्री यांचे मुंबईत निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांनी झोपेत असतानाच अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी पॅटसी पेरिन दुबास आणि चार मुले आहेत. शापूर मिस्त्री आणि सायरस मिस्त्री या दोन मुलांव्यतिरिक्त त्यांना लैला मिस्त्री आणि अलू मिस्त्री या दोन मुली आहेत.

फॅन्टम ऑफ बॉम्बे हाऊस अशी ओळख

पालोनजी हे टाटा समुहातील सर्वांत मोठे वैयक्तिक शेअर होल्डर होते. त्यांची टाटा समुहामध्ये १८.४ टक्के हिस्सेदारी होती. त्यांना समुहातील फॅन्टम ऑफ बॉम्बे हाऊस म्हणूनही ओळखले जाते.

पालोनजी मिस्त्री यांचा जन्म १९२९ मध्ये झाला. त्यानंतर त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये गेले.

व्यावसायिक कारकीर्द

पालोनजी यांनी वयाच्या १८ व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ते त्यांच्या वडिलांशी त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात जोडलेले होते. १९७० च्या दशकात त्यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय अबुधाबी, दुबई आणि कतार येथे विस्तारला. शापोरजी पालोनजी ग्रुपचा आधार मुंबई आहे आणि तो गेल्या १५६ वर्षांपासून व्यवसाय करत आहे. हा गट आता भारतासह आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये बांधकाम कार्य करत आहे.

मुंबईतील मलबार हिल जलाशय आणि आरबीआयची इमारत बांधली आहे. याशिवाय बीएसई इमारतीसह इतर अनेक इमारती या समूहानेच बांधल्या आहेत.

शापूरजी पालोनजी कन्स्ट्रक्शन लिमिटेड आणि फोर्ब्स टेक्सटाइल्सचे ते मालक होते. ते असोसिएटेड सिमेंट कंपनी आणि युरेका फोर्ब्सचे माजी अध्यक्ष होते.

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

मिस्त्री यांचा जीवनप्रवास २००८ मध्ये मनोज नंबुरू यांनी लिहिलेल्या द मोगल्स ऑफ रिअल इस्टेट या चरित्रातून उलगडला आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना जानेवारी २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

समुहाची व्याप्ती

शापूरजी पालोनजी समुहाच्या विविध कंपन्यांमध्ये ५० हजार कर्मचारी काम करत असून समुहाचा कारभार ५० देशांत आहे. १८६५ मध्ये स्थापन झालेल्या, बांधकाम क्षेत्रातील दिग्गज शापूरजी पालोनजी ग्रुपमध्ये अभियांत्रिकी आणि बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, पाणी, ऊर्जा आणि वित्तीय सेवा यासारख्या व्यावसायिक विभागांचा समावेश आहे.

कौटुंबिक माहिती

मिस्त्री यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा शापूर मिस्त्री यांच्याकडे शापूरजी पालोनजी समुहाची जबाबदारी आहे. त्यांचा लहान मुलगा सायरस मिस्त्री काही वर्षे टाटा ग्रुपचा अध्यक्ष होता. मिस्त्री यांची मोठ्या मुलीचे नाव लैला आहे. त्यांची धाकटी मुलगी आलू यांचे लग्न रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -