पुणे (हिं.स.) : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सुनील जाधव (वय २८, रा. मंचर) याला विशेष न्यायालयाने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
बाणखेलेच्या खुनानंतर फरारी संतोषला आश्रय देणाऱ्या सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय १९, रा. नारायणगाव), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८, रा. गुजरात) आणि तेजस कैलास शिंदे (वय २२, रा. नारायणगाव) यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले.
राण्या ऊर्फ ओंकार बाणखेले याचा पूर्ववैमनस्यातून आंबेगावमधील एकलहरे गावात खून करण्यात आला होता. या खुनानंतर संतोष जाधव हा फरार झाला होता. त्याच्यासह १४ जणांवर मोका कारवाई करण्यात आली आहे. मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष व महाकाल यांची नावे शार्प शूटर म्हणून पुढे आली होती.