Sunday, October 26, 2025
Happy Diwali

केंद्राकडून राज्यांना 'कोरोना अलर्ट'

केंद्राकडून राज्यांना 'कोरोना अलर्ट'

नवी दिल्ली (हिं.स.) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ५ कलमी कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पाच कलमी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत सांगितले आहे. आगामी काळात आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये सण आणि उत्सव साजरे केले जातात. या सणांसाठी गर्दी होते. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच कलमी कार्यक्रमांतर्गत कोरोनाविरूद्ध लढणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी घेण्यासह लसीकरणावर भर देण्याच्या सूचना देखील राज्यांना देण्यात आल्या आहेत. देशात गेल्या २४ तासांमध्ये ११ हजार ७९३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment