Thursday, October 9, 2025

अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातून ३ कैदी फरार

अमरावती (हिं.स.) : अमरावती मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री थरारक घडना घडली. अमरावतीचे मध्यवर्ती कारागृह बंदिस्त आहे. या कारागृहातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीन कैदी पळून गेले. विशेष म्हणजे कारागृहाच्या भिंतीवरून त्यांनी उड्या मारल्या.

त्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था काय करत होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन कैद्यांनी कारागृह पोलिसांना गुंगारा दिला. पसार झालेल्या कैद्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजनाघाटमधील दोन कैदी तर जन्मठेपीची शिक्षा भोगणारा रत्नागिरी जिल्ह्यातील एक कैदी आहे.

सकाळी तीन कैदी पळून गेल्याची माहिती कारागृह पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पसार आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. रोशन गंगाराम उईके, सुमित शिवराम धुर्वे तर जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला साहिल काळसेकर असे पसार झालेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

मध्यरात्री नेमके काय घडले

सर्व कैदी झोपेत होते. अशावेळी या तिघांनी पळून जाण्याचा प्लॅन आखला. याची कुणकुण दुसऱ्या कैदांना लागू दिली नाही. शिवाय कारागृह पोलिसांनाही काही कळले नाही. मध्यरात्री सर्व झोपलेले असताना हे सुरक्षा भिंतीजवळ आले. तिथून त्यांनी सुरक्षा भिंत ओलांडली, त्यानंतर पळून गेले.

एवढी मोठी सुरक्षा भिंत असताना ती त्यांनी कशी ओलांडली असेल, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान पोलीस उपायुक्त एस मकानदार यांनी या ठिकाणी भेट दिली व घटनास्थळाची पाहणी केली असून फ्रेजरपुरा पोलिस आरोपींचा कसुन तपास करीत आहेत.

Comments
Add Comment