कोल्हापूर : जयसिंगपूर येथे शिवसैनिक आणि यड्रावकर समर्थक आमने सामने आले. यावेळी दोन्ही गटात झटापट झाली असून याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदांरासह शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील शिवसेनेला पाठिंबा दिलेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात जयसिंगपुरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र कोल्हापुरातून ते मातोश्रीला जाण्यासाठी निघाले आणि नंतर यड्रावकरही परस्पर गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर आज जयसिंगपूर येथे शिवसैनिकांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनावेळी शिवसैनिक आणि यड्रावकर समर्थक आमने सामने आले.