श्रीनगर (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाममधील नौपोरा-खेरपोरा, त्रुब्जी भागात ही चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे.
गुप्तचर यंत्रणेकडून सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून जवळपास १५० दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय ५०० ते ७०० इतर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तेथे सुरू असून, हे दहशतवादी ११ प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दल दक्ष आहेत.
सैन्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न यशस्वी झालेला नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी आधीच अवलंबलेल्या मार्गांव्यतिरिक्त इतर मार्गही शोधत आहेत. नियंत्रण रेषेजवळील मानसेरा, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे ११ प्रशिक्षण शिबिरांमध्ये ५०० ते ७०० लोक दहशतवादाचे प्रशिक्षण घेत आहेत.