कल्याण (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेतील अनेक मंत्र्यांसह आमदारांनी देखील बंडाचा झेंडा आपल्या हाती घेतला व गुवाहाटी येथे गेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी देखील राजीनामे देत आहेत. कल्याणमधील शिवसेनेला खिंडार पडले असून शिवसेना विभागप्रमुख सुधीर वायले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत कल्याण मधील प्रभाग क्र. २ चे शिवसेना विभागप्रमुख सुधीर वायले यांनी भाजपचा झेंडा हाती घेत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, स्वप्नील काटे, विक्की गणात्रा, अर्जुन म्हात्रे, शक्तिवान भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सुधीर वायले यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला असून आगामी निवडणुकीत वायले हे प्रभाग क्र. १० मधून इच्छुक आहेत. या प्रभागात भाजपची विचारधारा आणि कामे नागरिकांपर्यंत पोहचवून, प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या प्रभागात तीनही उमेदवार भाजपचे निवडून आणू, असा विश्वास सुधीर वायले यांनी यावेळी व्यक्त केला.