Thursday, May 8, 2025

महाराष्ट्र

'त्या' ९ जणांची सामूहिक आत्महत्या नसून हत्या, दोघांना सोलापुरातून अटक

'त्या' ९ जणांची सामूहिक आत्महत्या नसून हत्या, दोघांना सोलापुरातून अटक

सांगली (हिं.स.) : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे गेल्या आठवड्यात उघड झाले होते. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. मात्र आता ९ जणांची आत्महत्या नसून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवशे या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. या दोन आरोपींनी ९ जणांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचे तपासात उघड झाले आहे. गुप्त धनाच्या हव्यासापोटी हे हत्याकांड केल्याचा संशय आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.


काय आहे पार्श्वभूमी


२० जून रोजी म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या बातमीने संपूर्ण जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी १३ जणांना अटक केली होती. मात्र आता म्हैसाळमधील या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून हे हत्याकांड असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (४८) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (३९, दोघेही राहणार सोलापूर) यांना अटक केली आहे.


म्हैसाळ येथे मयत डॉ. माणिक बल्लापा वनमोरे व पोपट यलाप्पा वनमोरे यांची गुप्त धनाबाबत एका अनोळखीसोबत भेटी होत होत्या. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी समोरच्या व्यक्तीस पैसे दिले होते. तसेच ती व्यक्ती वरचेवर रात्रीच्या वेळी म्हैसाळ येथील वनमोरे यांचे घरी येत होती, अशी खबर मिळाली होती. त्यानुसार सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे डॉ. वनमोरे यांचे घरी येणाऱ्या व्यक्तीबाबत सखोल तपास केल्यानंतर सदर व्यक्ती ही सोलापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अब्बास आणि धीरजला सोलापुरातून ताब्यात घेण्यात आले. १९ जून रोजी दोघे संशयित म्हैसाळमधून येऊन गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सदर व्यक्तींचा गुन्ह्यातील सहभागाबाबत सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Comments
Add Comment