वीस वर्षांपूर्वी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला आग लावून अयोध्येहून परत येणाऱ्या साठ कारसेवकांचा बळी घेतल्याच्या घटनेनंतर गुजरातमध्ये हिंसाचाराचा डोंब उसळला. त्यावेळी नरेंद्र मोदी हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी उसळलेल्या दंगलीत शेकडो लोकांचा बळी गेला. जाळपोळ व नासधूस यात हजारो कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या दंगलीचे खापर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदींवर फोडण्याचा प्रयत्न केला. दंगलखोरांना मोदींनी फूस लावली व मोदींचा कट कारस्थानात
सहभाग होता, इथपर्यंत आरोप केले गेले. गुजरात सरकारने या दंगलीची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे माजी संचालक आर. के. राघवन यांच्या नेतृत्वाखाली ६३ जणांचे विशेष पथक नेमले होते. एसआयटीने (स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम) मोदी यांना क्लीन चीट दिली व दंगलीमागे हात असल्याचा मोदींच्या विरोधात कोणताही पुरावा नाही, असा अहवाल सादर केला. खरे तर त्यानंतर हे प्रकरण शांत व्हायला हवे होते. पण गुजरातच्या दंगलीत मृत्यू पावलेल्या काँग्रेसच्या खासदाराच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका करून एसआयटीच्या अहवालालाच आव्हान दिले. दीर्घकाळ त्याची सुनावणी झाली. गेल्या वर्षी म्हणजे ९ डिसेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला व तो २४ जून २०२२ रोजी दिला. मोदी यांच्याविरोधात दंगलीच्या संदर्भात कोणताही पुरावा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालास स्पष्ट म्हटले आहे. एवढेच नव्हे तर याचिकाकर्त्या जाकिया कोणाच्या तरी इशाऱ्यावरून काम करीत आहेत, असा ठपका या निकालात न्यायालयाने ठेवला आहे. याचिकेतील अनेक गोष्टी खोट्या आहेत व हे प्रकरण १६ वर्षे जिवंत ठेवण्याचे काम काहींनी केले, असेही निकालात नमूद केले आहे. कायद्याचा चुकीचा वापर केला म्हणून याचिकाकर्त्यांवर कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. गेल्या आठ वर्षांत त्यांनी देशाची मान जगात उंचावली आहे. ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी त्या राज्याचा चौफेर विकास केला आणि संपूर्ण देशाला गुजरात माॅडेलचा आदर्श धडा घालून दिला. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी भाजपचा मोठा विस्तार केला. सलग चारवेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. त्यांच्या काळात गुजरात हा भाजपचा भक्कम किल्ला बनला. मोदींना त्या राज्यात कोणालाही आव्हान देणे जमले नाही. मोदी दिल्लीला आल्यावरही गुजरातमध्ये भाजपला पर्याय देणे विरोधी पक्षाला साध्य झाले नाही. त्यामुळे विरोधकांचा मोदींवर राजकीय सुडाने आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सतत चालू असतो. त्यातलेच एक उदाहरण म्हणजे जाकिया यांनी एसआयटीच्या अहवालाविरोधात केलेली याचिका म्हणावी लागेल. सन २००२ मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगल झाली. गेली वीस वर्षे या दंगलीचे खलनायक म्हणून काँग्रेससह भाजप विरोधकांनी मोदींच्या विरोधात मोहीम चालू ठेवली होती. चौकशीच्या सर्व पातळीवर क्लीन चीट मिळाल्यावरही मोदींनी संयम बाळगला. चौकशी चालू असताना ते सत्तेवर असूनही चौकशीसाठी त्यांनी व अमित शहा यांनी पूर्ण सहकार्य केले. चौकशी यंत्रणांवर दबाव आणला, असे एकही उदाहरण कोणत्याही अहवालात नमूद केलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अमित शहा यांनी म्हटले की, ‘‘मोदी भगवान शंकर की तरह १८-१९ साल विषपान करते रहे, अब सत्य सोने जैसा चमक रहा हैं।’’ सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीच्या अहवालाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली.
गुजरातमधील तत्कालीन मोदी सरकारवर केलेले आरोप हे राजकीय हेतून प्रेरित होते, हेच या निकालाने सिद्ध केले आहे. गेली वीस वर्षे ज्यांनी मोदींवर दंगलीचे खलनायक ठरवून आरोप केले, ते आता त्यांची माफी मागणार आहेत काय? मोदींनीच दंगलीचे कारस्थान रचले, दंगलखोरांना उत्तेजन दिले, असे आरोप मीडिया आणि विरोधकांनी सतत चालवले होते. अनेक एनजीओ चालविणारे मोदी विरोधक गुजरात दंगलीनंतर सक्रीय होते. मोदी वीस वर्षे शांत राहिले, त्यांनी विरोधकांवर कसलेही आरोप केले नाहीत. मुख्यमंत्री असताना गुजरातचा विकास आणि देशाचे पंतप्रधान झाल्यापासून ‘सबका साथ सबका विकास’ हा त्यांनी ध्यास घेतला आहे. केवळ अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठी व त्यांची निवडणुकीत एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी गुजरात दंगलीचे खापर विरोधकांनी सतत मोदींवर फोडले. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ते सारे आता तोंडावर आपटले आहेत. गुजरात दंगलीनंतर देशातील बहुसंख्य मीडिया काँग्रेस पक्ष व त्या पक्षाच्या भूमिकेला साथ देत होता. मोदींना मुख्यंत्रीपदावरून हटवावे, यासाठी काँग्रेसने चंग बांधला होता. पण गुजरात दंगलीत ज्या रामभक्त कारसेवकांचा होरपळून बळी गेला, त्याविषयी विरोधकांनी कोणी ब्र काढला नाही. दंगल झाली तेव्हा संसदेचे अधिवेशन चालू होते, संसदेतही विरोधकांनी कारसेवकांच्या हत्येचा निषेध केला नाही. गुजरात दंगलीनंतर सर्व राजकीय पक्षांचे मोदी हेच टार्गेट होते. गुजरातमध्ये पूर्वी काँग्रेसचे अनेक वर्षे सरकार होते, त्या काळात किती दंगली झाल्या, किती काळ संचारबंदी जारी झाली, किती लोक मृत्युमुखी पडले, याची आकडेवारी जाहीर झाली, तर दंगली कोणाच्या काळात अधिक झाल्या, हे देशाला समजू शकेल. मोदींनी गोध्रा हत्याकांडानंतर तातडीने केंद्रीय सुरक्षा दलाला पाचारण करून शांततेचे आवाहन करून दंगली रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. मोदींवरील आरोप हे सुडाचे होते.