अनुराधा परब
जन्म आणि मृत्यू यात एका श्वासाचे अंतर. माणूस ज्याला अंत समजतो तीच पुढील जीवनाची नांदी असते, हेच अंतिम सत्य यमाने नचिकेताला सांगितलं. या प्रखर सत्याचा स्वीकार करणं अनेकांसाठी अवघड असतं. कारण मृत्यूविषयीचे भय, जीवनाविषयीची अनिश्चितता, क्षणिकता. भोवतालातील सुष्ट दुष्ट निसर्गशक्तींपासून संरक्षण मिळावे, त्यांच्यापासून कोणताही त्रास होऊ नये, यातूनच उग्र, संरक्षक, प्रसंगी विघ्ननाशक दैवतांची निर्मिती झालेली दिसून येते. ही दैवते प्रसन्न व्हावीत या आनुषंगाने धार्मिक विधी अस्तित्वात आले. धर्म, नीती, न्याय या तत्त्वांवर या विधींची बांधणी झालेली दिसते. स्थळीय (त्या-त्या ठिकाणच्या) उपासना किंवा ग्रामदेवतांची उपासना ही सर्वात प्राचीन समजली जाते. संकटांपासून ते गावातील नैतिक-निष्ठापूर्ण व्यवहारांचे नियमन करणाऱ्या शक्तिरूप देवतांवरील विश्वास, श्रद्धा ग्रामसंस्कृतीचे मातीशी तसेच मानसिकतेशी असलेले नाते स्पष्ट करते. या सगळ्यातूनच परंपरा आकाराला आली आणि पिढी दर पिढी प्रवाहित होताना नव्यातील चांगल्याचा स्वीकार करत गेल्यामुळे टिकूनही राहिली.
कोकणातील गावऱ्हाटीचं स्वरूपदेखील वरील तीन तत्त्वांवर आधारित आहे. याचीच मोट बांधत गावाला एकोप्याने जोडणारी जीवनपद्धती बारा पाचाच्या रूपाने अस्तित्वात आली. प्रकृती म्हणजेच निसर्गाला, त्यातल्या पंचतत्त्वांना जाणणाऱ्या तत्कालीन लोकांनी गावाचा कारभार लोकसहभागातून एकमताने चालावा यासाठी एक शासनव्यवस्था निर्माण केली. तीच ही गावऱ्हाटी. स्वयंशासित स्वरूपाची ही व्यवस्था आजदेखील कोकणामध्ये पाहायला मिळते. निसर्गाच्या गूढतेचा शोध घेणे हा मानवी जिज्ञासेचा भाग असला तरीही त्याला काही मर्यादा आहेत. त्याच शोधाच्या एका अतर्क्य टप्प्यावर गूढतेला देवत्व दिले गेले. या निसर्गशक्तींना – पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये तसेच मन आणि बुद्धी-बारा पाचाच्या व्यवस्थेमध्ये केंद्रवर्ती ठेवले गेले. समाजनिष्ठ अशा या व्यवस्थेमध्ये संपूर्ण गावाने एकदिलाने एकत्र येण्यातून सामाजिक संघटित शक्ती जशी अभिप्रेत होती आणि आहेही. त्याचबरोबरीने अशा शक्तीचा लाभ सगळ्या गावाला सुख-समाधानाच्या रूपात मिळावा, असा व्यापक विचार दडलेला आहे. या व्यवस्थेच्या चालकाला-ज्याला पूर्वसत्तेचा अधिकारी म्हटले जाते, त्याने गावऱ्हाटी निःस्वार्थी, निःपक्षपाती तसेच न्याय-धर्माने चालवणे अपेक्षित असते.दुभंगलेला समाज कधीही चांगली प्रगती करू शकत नाही तसेच दुभंगलेल्यांना अधिक दुबळं करणंसुद्धा तुलनेने सोपं असतं, याची जाणीव गावऱ्हाटीच्या रचनाकर्त्यांना निश्चितच असली पाहिजे. याशिवाय समाजपुरुष अशी एक संकल्पना यामागे असून शारीरइंद्रिये तसेच पंचमहाभूतांच्या मार्फत देहाचे कार्य जसे चालते त्याप्रमाणे गावगाडा सुरळीतपणे हाकला जावा, यासाठी समाजातील वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींना त्यांच्या योग्यतेनुसार करून दिलेली कामाची वाटणी म्हणजेच गावऱ्हाटी होय. गावाची जी संरक्षक देवता असते तिला ग्रामदैवत म्हणतात. ही दैवते नेमस्त भागापुरती प्रभावशाली असतात, असेही म्हटले जाते. त्यामुळे दैवतांची नावे जरी वेगवेगळी असली तरीही त्यांचे मूळ स्वरूप एकच असल्याचे लक्षात येईल. यांनाच दैवतशास्त्राच्या परिभाषेमध्ये क्षेत्रपाल असे म्हणतात. क्षेत्र याचा अर्थ नेमून दिलेली जागा, जमीन, परीघ. अशा क्षेत्राचे रक्षण करणाऱ्या देवता गावाच्या चारही दिशांना असतात. या देवतांमुळे तो भूभाग हा राखला जातो, अशी एक धारणा समाजात असते. म्हणूनच अशा देवतांना राखणदार असाही शब्दप्रयोग कोकणामध्ये वापरला जातो. दक्षिण कोकणामध्ये वेताळ तथा वेतोबाची १४३ मंदिरे आहेत. वेताळ किंवा वेतोबा ही अशीच एक राखणदार देवता.
त्याच्यासंदर्भात असे म्हटले जाते, की ही देवता रात्रीच्या वेळेस सगळ्या गावाभोवती हातात काठी घेऊन फिरत असते. वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध आरवलीचे ग्रामदैवत वेतोबासंदर्भातील आख्यायिकासुद्धा अशीच आहे. वाईट शक्तींपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी फिरणाऱ्या या दैवतापुढे संकटेही नामोहरम होतात, अशी श्रद्धा माणसांमध्ये आढळते. गावाचे रक्षण करणाऱ्या देवाचे फिरून जोडे झिजले असावेत आणि त्याने अनवाणी फिरू नये, अशी त्यामागची भावना आहे. त्यामुळेच अडल्या-नडलेल्यांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या वेतोबाला चपलांचे जोड आणि केळ्याचा लोंगर अर्पण करण्याची प्रथा पाळली जाते. देवळाच्या सभामंडपामध्ये चामड्याच्या चपलांचे ढीग पाहायला मिळतात.
या चपलादेखील साध्यासुध्या नसून भव्य मानवाकृती उंचपुऱ्या वेतोबाला साजेशा मोठ्या आकाराच्या असतात. वेतोबाची मूळ मूर्ती ही फणसाच्या लाकडापासून घडवलेली होती. ती कालांतराने पंचधातूंची घडवली गेली असली तरीही आजही आरवली परिसरामध्ये बांधकामात फणसाच्या लाकडाचा वापर निषिद्ध आहे. शिवाय फणसाच्या झाडाखाली किंवा समोर उभे राहून एखादी इच्छा व्यक्त केली, तर ती थेट वेतोबापर्यंत पोहोचते, असाही एक समज प्रसृत आहे. याच दृढ समजामुळे इथल्या फणसाच्या झाडांना अभय मिळालेले दिसते. थोडे तटस्थपणे या श्रद्धेकडे पाहिल्यास एकाच वेळी अलौकिक शक्तींविषयीचा आदर आणि दुसरीकडे निसर्गाप्रती प्रेम यांचा मेळ यामागे घातला असल्याचे दिसून येते.
संस्कृतीच्या अंतरंगातील ग्रामसंस्कृतीचे स्वरूप हे मातीशी घट्ट जुळलेले आहे. त्यामुळेच माती ही आई होते तशीच ती अन्नपूर्णाही होते. आकाश मंडप, पृथ्वी आसन म्हणतात ते उगाच नाही. त्याविषयी पुढील भागात…